सावळीविहीर येथे मध्यरात्री बारा वाजता छत्रपतींच्या स्मारकाला मानवंदना देत, पुष्पहार अर्पण करत, छत्रपतींचा जयघोष करून फटाक्यांच्या आतषबाजीत जयंती सोहळ्याला सुरुवात!

शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील युवा ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मध्यरात्री बारा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत पुष्पहार अर्पण करण्यात येऊन या जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. 

मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान सर्व युवक, शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमा होऊन सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत छत्रपतींना पुष्पहार अर्पण केला तसेच छत्रपतींना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने येथे व परिसरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवार19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर  अभिषेक झाल्यानंतर छत्रपतींची भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. तरी शिवप्रेमी नागरिकांनी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. तसेच छत्रपतींच्या मिरवणुकीत, पालखी सोहळ्यात व विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन येथील समस्त युवा ग्रामस्थ व शिवप्रेमी युवकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments