चारा टंचाईच्या भीतीने शेतकरी हतबल, बाजार समितीच्या उलाढालीलाही फटका
राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम आता जनावरांच्या बाजारावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. चारा व पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक शेतकरी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, खरेदीदारांची संख्या घटल्याने जनावरांच्या किमतींमध्ये सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे चित्र आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत लोणी येथे भरणारा जनावरांचा बाजार राज्यातील महत्त्वाच्या बाजारांपैकी एक मानला जातो. या बाजारात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी जनावरे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक भागांतील शेतकरी नवीन जनावरे खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
चारा टंचाई आणि जनावरांच्या पालनपोषणाचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीपेक्षा विक्रीला प्राधान्य दिले आहे. परिणामी बाजारात जनावरांचा पुरवठा वाढला असला तरी मागणी कमी झाल्याने किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, साधारणपणे आठवड्याला १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या लोणीच्या जनावरांच्या बाजारातील व्यवहारांवरही दुष्काळाचा परिणाम झाला आहे. यंदा बाजारातील उलाढाल सुमारे २ ते ३ कोटी रुपयांनी घटल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
दुष्काळाची तीव्रता वाढल्यास आणि चारा टंचाई अधिक गंभीर झाल्यास जनावरांच्या बाजारासह कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या महसूलावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यातही आगामी काळाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी -- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments