टाकळीभान प्रतिनिधी:-तालुका पोलीस श्रीरामपूर ठाण्याचा पदभार स्वीकारताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांनी पोलीस व महसूल पथकाच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई केली आहे. भामाठाण शिवारात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १६५ ब्रास वाळू साठ्यासह वाळू वाहतूक करणारा टेम्पो असा एकूण १४ लाख ९७हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी पत्रकात म्हटले, की अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना अंबादास पवार यांनी अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर मोठी धडक कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १४ लाख
९७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस व महसूल पथकाने भामाठाण शिवारातील गोदावरी पात्रांलगत असलेल्या गट क्र. १, गट क्र. २६०, गट क्र. ४४ व भामाठाण जुने गावठाण येथे संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ९ लाख ९० हजार रुपये किमतीचा १६५ ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:१५
वाजण्याच्या सुमारास भामाठाण ते माळवाडगाव जाणारे रोडवर भामाठाण शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो मिळून आला. पोलिसांनी ५ लाख ७हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत टेम्पो चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक कल्पना पवार, तहसीलदार मिलिंद वाघ, निरीक्षक अरुण धनवडे, रामेश्वर ढोकणे, अमोल जाधव, अमोल आमले, सलमान सय्यद, ग्राम महसूल अधिकारी अशोक चितळकर, प्रशांत आहोळ, राहुल साठे, सुरेंद्र पवार यांनी केली आहे.
0 Comments