भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली भुईकोट किल्ल्याची पाहणीसंबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून घेतली मंजूर कामांच्या आराखड्याची माहिती; प्रत्यक्ष जागेवर घेतला आढावा



अहिल्यानगर : शहरालगतच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून मंजूर झालेल्या कामांच्या संपूर्ण आराखड्याची माहिती घेत, प्रत्यक्षात किल्ल्याच्या कोणत्या भागात काय होणार आहे, याचा जागेवरच आढावा घेतला.
डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी केली. प्रस्तावित कामांची रचना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, परिसराचे नियोजन तसेच पर्यटकांच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी संबंधितांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाहणीदरम्यान आराखड्यातील कामांची प्रत्यक्ष जागेशी सांगड घालत आवश्यक त्या बाबींवर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या ठिकाणी आवश्यक बदल किंवा सुधारणा करणे गरजेचे आहे, त्याबाबतही त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. ऐतिहासिक वारशाचे मूळ स्वरूप आणि महत्त्व जपतच पुढील नियोजन करण्यात यावे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

भुईकोट किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लष्करी प्रशासनासोबतचा सामंजस्य करार (MOU) हा महत्त्वाचा टप्पा होता. हा विषय मार्गी लागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पातळीवर झालेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे MOU पूर्ण झाला असून, आता मंजूर आराखड्यानुसार पुढील प्रक्रिया मार्गी लागली आहे.

किल्ल्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तू, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भांचे जतन करून ते नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे नियोजन आहे. ‘Discovery of India’सह सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संदर्भांनाही या माध्यमातून उजाळा मिळणार आहे.

भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या इतिहासाचा आणि अस्मितेचा महत्त्वाचा ठेवा आहे. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करत त्याला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने मंजूर आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी करून डॉ. विखे पाटील यांनी कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments