लोणीत भक्तीमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा संपन्नश्री द्वारकाधीश करिअर इन्स्टिट्यूटतर्फे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन



लोणी : “नंद के आनंद भयो... जय कन्हैयालाल की!” या जयघोषाने लोणी परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. श्री द्वारकाधीश करिअर इन्स्टिट्यूट, लोणी यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
लोणी-पाथरे-सोनगाव रोडवरील सुरभी मंगल कार्यालय अँड लॉन्स, लोणी बुद्रुक येथे रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक व मंगलमय वातावरणात श्रीकृष्णाच्या अभिषेक सोहळ्याने झाली. बालरूपातील श्रीकृष्णाची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित कथा, कीर्तन, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
लहान मुलांसह विविध कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. धार्मिक प्रबोधन, अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.
या कार्यक्रमासाठी इस्कॉन अहिल्यानगरचे अध्यक्ष श्रीमान गिरीवरधारी प्रभूजी प्रमुख उपस्थित म्हणून लाभले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी भगवद्गीतेचे महत्त्व, गीता मनुष्याला जीवनाचे ध्येय समजून घेण्यासाठी कशी मार्गदर्शक ठरते, तसेच श्रीकृष्ण जन्माचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी उपस्थितांना सुंदर व प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक, विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी इस्कॉनचे वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान भगवान प्रभूजी, विठ्ठलानंद प्रभूजी, इंद्रदुणय प्रभूजी, राधिका रमण प्रभूजी यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नागरिक, विद्यार्थी तसेच माता-भगिनींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री द्वारकाधीश करिअर इन्स्टिट्यूटच्या या स्तुत्य उपक्रमामुळे लोणी परिसरात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याचे उपस्थित भाविकांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments