शिवार फेरीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी ज्ञानयात्रा ठरेल-अण्णासाहेब म्हस्के पाटील.

विजय बोडखे 

राजुरी (वार्ताहर )बदलत्या काळात शेती अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे सुरू असून, संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘शिवार फेरी’ शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची ज्ञानयात्रा ठरेल असा विश्वास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील व कृषी संचालक प्रा. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी,पायरेन्स संचलित कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. विजया अंबाडे, संस्थेच्या संचालिका रोहिणीताई निघुते, संचालक दत्ता पाटील शिरसाठ, पोपटराव वाणी, गणपतराव शिंदे,अशोकराव गागरे, बबनराव काळे, मिनाक्षी निर्मळ,ज्ञानेश्वर खर्डे, मीनाक्षी निर्मळ, तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब भोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री शैलेश देशमुख यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       आपल्या भाषणात आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष शेतात उतरून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत, ही प्रवरेची मोठी जमेची बाजू आहे. आता शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असून, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्था आणि कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

         जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांची गरज असून सेंद्रिय शेतीसह नाविन्यपूर्ण पीक पद्धतीला प्राधान्य मिळाले पाहिजे. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून विविध पिकांवर प्रयोग सुरू आहेत. शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन पिके, तंत्रज्ञान आणि शेतीतील बदल प्रत्यक्ष पाहता येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापर करावा. तसेच शेतीला पूरक व्यवसायांमध्येही मोठ्या संधी असून शेतकऱ्यांनी त्याकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 
       B“प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचा विद्यार्थी केवळ शिक्षण घेऊन नोकरी करणारा नसावा, तर तो शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील दुवा ठरावा, हा प्रवरेचा प्रयत्न आहे. शिवार फेरीबरोबरच विविध तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा आणि शेती क्षेत्राचा दोघांचाही फायदा होत आहे,” असे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले.
         प्रास्ताविकात प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी संस्थेच्या कृषी क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली.  
       शिवार फेरीच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळबाग, फुलशेती, ऊस तसेच जिरायती शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. भविष्यात दर्जेदार कृषी शिक्षणाबरोबरच दर्जेदार कृषी उद्योजक घडविण्यावर संस्थेचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळबाग, ऊस तसेच विविध नाविन्यपूर्ण पीक प्रात्यक्षिकांच्या प्लॉटला भेटी दिल्या. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. कमी पाणी, कमी खते आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादन घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
       विशेष म्हणजे प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या प्रक्षेत्रावर विविध भागांतील पीक पद्धती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सफरचंद, ॲपल बोर आणि खजूर यांसारख्या नवीन पिकांची लागवडही करण्यात आली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर मिळत .सूत्रसंचालन डॉ. रमेश जाधव यांनी केले

Post a Comment

0 Comments