राजुरी (वार्ताहर) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या स्पोर्ट्स फिजिओथेरपी विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यक, फिजिओथेरपी व पुनर्वसन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी दिली.
या शैक्षणिक भेटीस संस्थेचे विश्वस्त माननीय श्री. ध्रुव विखे पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच क्रिडा संचालक डॉ. सुनील बुलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांनी या भेटीचे नेतृत्व केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि तिरंदाजी अशा विविध क्रीडा प्रकारांतील प्रशिक्षण व कामगिरीविषयक बाबींची माहिती घेतली. उच्चस्तरीय खेळाडूंच्या प्रशिक्षण प्रक्रियेत क्रीडा विज्ञानाची भूमिका, शारीरिक क्षमता वाढविण्याच्या पद्धती तसेच दुखापतींचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन यांचा विद्यार्थ्यांनी जवळून अभ्यास केला.
यासोबतच बायोमेकॅनिक्स, क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा पोषण, क्रीडा शरीरविज्ञान, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग आणि अँथ्रोपोमेट्री या क्रीडा विज्ञानातील महत्त्वपूर्ण शाखांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. विविध क्रीडा दुखापतींचे मूल्यांकन, उपचार, पुनर्वसन, रिकव्हरी, दुखापत प्रतिबंध तसेच खेळाडूंना सुरक्षितपणे पुन्हा मैदानावर परत आणण्यासाठी आवश्यक उपचारपद्धतींचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.
0 Comments