प्रवरेत बुधवारी शिवार फेरीचे आयोजन आधुनिक शेतीचा जागर यासह‘क्लासरूम टू फील्ड’ संकल्पनेतून शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष धडे



राजुरी (वार्ताहर) शेती बदलतेय... तंत्रज्ञान बदलतेय... आणि या बदलत्या शेतीची दिशा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी प्रवरा नेहमीच सज्ज असते. जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था,लोणी, पायरेन्स कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी येथे भव्य शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.


‘क्लासरूम टू फील्ड’ या अभिनव संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी शिकलेले कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात उतरविले आहे. या प्रयोगातून विकसित झालेल्या कृषी तंत्रज्ञान पार्कची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी शेतकरी बांधवांना या शिवार फेरीत मिळणार आहे. त्यामुळे ही शिवार फेरी केवळ प्रक्षेत्राची पाहणी न राहता आधुनिक शेतीची दिशा दाखविणारी कृषी ज्ञानयात्रा ठरणार आहे. 


बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात, कमी खर्चात आणि अधिक उत्पादन घेणे हे शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या प्रक्षेत्रावर मल्चिंग तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन, ग्रो बॅगमधील उत्पादन, मर्यादित खतांचा व पाण्याचा वापर, जैविक व सेंद्रिय शेती आदींचे प्रयोग करण्यात आले आहेत.
शिवार फेरीत शेतकऱ्यांना कोबी, फुलकोबी, झेंडू, वांगी, भेंडी, पालेभाज्या, भोपळा, कारली, दोडके, घोसाळे, काकडी आदी पिकांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत. त्याचबरोबर केळी, आंबा, खजूर, सफरचंद, अॅपल बेर, डाळिंब, पेरू, अंजीर आणि ऊस या पिकांबाबतही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.

प्रवरा कृषी शास्त्र संस्थेने शेतीला केवळ पीक उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता कृषीपूरक व्यवसायांची जोड दिली आहे. नर्सरी, मशरूम उत्पादन, मधुमक्षिकापालन, गांडूळखत व व्हर्मीवॉश निर्मिती, जैविक-सेंद्रिय निविष्ठा, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, फळ-भाजीपाला प्रक्रिया आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’ अशा विविध उपक्रमांची माहितीही शिवार फेरीत देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना जमिनीची निवड, पिकांची निवड, मशागत, लागवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणी, काढणीनंतरची हाताळणी आणि बाजारपेठेपर्यंत उत्पादन पोहोचविण्याचे मार्केटिंग तंत्र प्रत्यक्ष शिकविण्यात येत आहे. त्यामुळे कृषी शिक्षणातून उत्पादनाबरोबरच प्रक्रिया आणि बाजारपेठेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे.
ग्रो बॅगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भोपळा, कारली, दोडकी, घोसाळे आणि काकडीचे उत्पादन घेतले असून, काही प्रयोगांमध्ये ६० किलोपर्यंत भोपळ्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. जैविक व सेंद्रिय पद्धतीचा वापर करून कमी खर्चात उत्पादन घेण्याचे हे प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक ठरणार आहेत.

प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उत्तमराव कदम म्हणाले, “कृषी शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचावे, हा शिवार फेरीचा मुख्य उद्देश आहे. ‘क्लासरूम टू फील्ड’च्या माध्यमातून कृषी शिक्षणाचा थेट विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.”
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबत उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भविष्यात प्रवरा शैक्षणिक संकुलातील इयत्ता अकरावीपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
        या शिवार फेरीस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कृषी उद्योजक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
         या उपक्रमासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्सचे सचिव डाॅ.निलेश बनकर, तालुका कृषि अधिकारी डाॅ.आबासाहेब भोरे,कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री शैलेश देशमुख,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. काजल खंडागळे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चंद्रकला सोनवणे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 
कोट..
शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान... विद्यार्थ्यांच्या प्रयोगातून नव्या शेतीची दिशा... आणि प्रवरेतून कृषी शिक्षणाचा विस्तार! अशा त्रिसूत्रीवर आधारित ही शिवार फेरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments