सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत १८ गावांत ‘एक गाव, एक गणपती’, ७६ गणेश मंडळांची स्थापना, डीजेचा वापर टाळण्यास मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१५--गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेश मंडळे, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून उत्सवाला शांततामय आणि शिस्तबद्ध सुरुवात झाली आहे. सोयगाव पोलिस ठाणे हद्दीतील ५१ गावांपैकी ३३ गावांमध्ये ७६ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. १८ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास पोलिस प्रशासनाला यश आले असून गावकऱ्यांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे.
स्थापित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींपैकी ५ फूट व त्यापेक्षा जास्त उंचीच्या २७ गणेश मंडळांच्या मूर्ती, तर ५ फूटापेक्षा कमी उंचीच्या ५२ गणेश मंडळांच्या मूर्ती आहेत. गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी घेण्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले असून, आतापर्यंत २९ गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेतली आहे. उर्वरित मंडळांचीही परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी दिनकर गोरे यांनी सांगितले.गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत एकाही गणेश मंडळाकडून डीजेचा वापर करण्यात आलेला नाही. ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सोयगाव येथे एका गणेश मंडळाने बँजोचा वापर केला होता. मात्र, त्याची ध्वनी पातळी ७५ ते ८० डेसिबल इतकी ठेवण्यात आली होती. याबाबतही प्रशासनाकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानंतर इतर गणेश मंडळांनीही ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे तसेच बँजो न वाजविण्याचा निर्णय घेण्याकडे मंडळांचा कल आहे.गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्वसामान्य नागरिकांना उत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घेता यावा आणि कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण अथवा अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याकडून गणेश मंडळे, पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क व समन्वय ठेवण्यात येत आहे.
गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या घेणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे तसेच विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी गणेश मंडळे आणि नागरिकांचे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले जात आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन आणि इतर नागरिकांच्या हक्कांचा विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले.
गणेश मंडळांनी डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपकांचा वापर टाळावा, विसर्जन मिरवणुका शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ‘एक गाव, एक गणपती’सारख्या उपक्रमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्याबरोबरच पर्यावरणपूरक आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.
सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत आतापर्यंत गणेशोत्सव शांततेत सुरू असून, आगामी विसर्जन सोहळाही शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments