श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा देशभर प्रसार करण्यासाठी ‘साई कीर्तनकार, साई प्रवचनकार व साई कथाकार’ नियुक्तीदेशभरातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी एकूण ५२ पदे भरणार!




शिर्डी( प्रतिनिधी )-श्री साईबाबांच्या विचारांचा, शिकवणुकीचा आणि मानवतावादी संदेशाचा देशभर व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘साई कीर्तनकार, साई प्रवचनकार व साई कथाकार’ यांची नियुक्ती करण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत देशातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी एकूण ५२ पदे उपलब्ध आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांसाठी प्रत्येकी ३ पदे, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी प्रत्येकी २ पदे, तर उर्वरित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रत्येकी १ पद निश्चित करण्यात आले आहे.
नियुक्त होणाऱ्या व्यक्तींना श्री साईसच्चरित्र तसेच श्री साईबाबांच्या जीवनकार्याची सखोल माहिती असणे आवश्यक असून, संबंधित राज्यातील स्थानिक भाषेत श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करण्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित नसावी आणि अर्जासोबत पोलीस पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
नियुक्त व्यक्तींमार्फत विविध ठिकाणी साई प्रवचन, साई कीर्तन, साई सत्संग व साई कथा यांच्या माध्यमातून श्री साईबाबांचे विचार, शिकवणूक व मानवतावादी मूल्ये भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. प्रत्येक नियुक्त व्यक्तीने दरमहा किमान ५ साई प्रवचन, कीर्तन किंवा सत्संग आयोजित करणे अथवा ३ दिवसांच्या प्रत्येकी २ साई कथा आयोजित करणे आवश्यक राहील. मासिक कार्याची माहिती असलेली कार्य डायरी सादर केल्यानंतर संबंधितांना मानधन अदा करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत बायोडाटा, पासपोर्ट आकाराचा फोटो, स्व-साक्षांकित शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र अथवा अनुभवाचे पुरावे, साई कीर्तन, प्रवचन, कथा किंवा सत्संगाच्या कार्याचे फोटो, व्हिडिओ, वर्तमानपत्रातील प्रसिद्धीचे पुरावे, उपलब्ध असल्यास कार्य डायरी, पोलीस पडताळणी अहवाल तसेच आवश्यक ओळख व पत्त्याचा पुरावा सादर करावा. सध्या नोकरीत असलेल्या उमेदवारांनी, लागू असल्यास, संबंधित संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी’ यांच्या नावे संस्थानच्या शिर्डी येथील कार्यालयात दि. ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी पोहोचेल, याची दक्षता घ्यावी. अर्जाचा नमुना संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sai.org.in तसेच शिर्डी येथील संस्थानच्या मंदिर विभागाच्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहे. अपूर्ण अथवा मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Post a Comment

0 Comments