सोयगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा –




दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८-- सोयगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी करपू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असूनही अनियमित व अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. 

परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शासनाने तात्काळ सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दि.०८ मंगळवारी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, सोयगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, दुष्काळी निकष लागू करणे, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे, शेतीपंपांना नियमित व पुरेसा वीजपुरवठा करणे, तसेच महसूल व कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून शासनाकडे तातडीचा अहवाल पाठविण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान सध्याची परिस्थिती अशीच कायम राहिली तर आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच आवश्यक नियोजन करून शेतकरी व पशुपालकांना कोणत्याही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे, जिल्हा सरचिटणीस सुनील माकोडे, तालुका शिक्षक सेल अध्यक्ष सुनील चोरमाले, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील चव्हाण, अनिल चव्हाण, प्रमोद कोते, नामदेव लांडगे, भागवत देवकर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments