मोबाईल चोरीचा तपास आठ दिवसांत न लागल्यास पोलीस स्टेशन समोर सर्वपक्षीय उपोषणाचा इशाराश्रीरामपूर आठवडे बाजारातील नऊ मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांना निवेदन



दिलीप लोखंडे 
टाकळीभान प्रतिनिधी : शहरातील आठवडे बाजारातून एकाच दिवशी नऊ मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली.
शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी आठवडे बाजारात पत्रकार, प्राचार्य, पोलीस, शिक्षक, व्यापारी, रिक्षाचालक, मजूर आदी नागरिकांचे एकाच वेळी नऊ मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरीचा तपास जलदगतीने करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण गुलाटी, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्ये, रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, रिपाईच्या रमादेवी धीवर तसेच ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांच्या हस्ते श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशी दर शुक्रवारी चार ते पाच मोबाईल चोरीला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, अनेक वेळा चोरीची स्वतंत्र फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी मोबाईल हरवल्याचा अर्ज घेतला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे चोरी करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले.
गेल्या शुक्रवारी एकाच वेळी नऊ मोबाईल चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. चोरीला गेलेले मोबाईल ट्रेस झाले तरी ते परराज्यात दाखवत असल्याने तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चोरीच्या मोबाईलचा थेट वापर न करता त्यातील डिस्प्ले, अंतर्गत भाग व स्पेअर पार्ट्सचा वापर केला जात असल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान असल्याचेही नमूद करण्यात आले.
आठवडे बाजाराच्या दिवशी चोरीच्या घटना रोखण्यासाठी दर शुक्रवारी बाजार परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोबाईल चोरीप्रकरणी आठ दिवसांच्या आत आरोपींना पकडून जेरबंद केले नाही, तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर सर्वपक्षीय उपोषण करण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी नगरसेवक दिलीप नागरे नगरसेवक संजय गांगड कामगार नेते नागेश सावंत शिवसेनेचे सचिन बडदे रिपब्लिकन सेनेचे चरण त्रिभुवन लहुजी सेनेचे हनीफ पठाण ,रियाज पठाण मुक्तारभाई शहा मर्चंट चे संचालक योगेश ओझा, पत्रकार करण नवले, अशोक झोटिंग, गफार पोपटिया दिलीप लोखंडे, संदीप जगताप, मधुकर माळवे, बापूसाहेब नवले ,विकास बोर्ड ,अशोक रणनवरे, सतीश कुदळे ,हरिभाऊ बिडवे, अक्षय नाईक, किशोर कांबळे, गोरख वायकर, सुनील लोणके ,बाळासाहेब विजय शेलार, उंडे मिलिंद, रमाबाई धीवर आधी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments