*राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय स्तरावर जळगावच्या चिमुकल्यांचा बोलबाला: पोलीस दल स्केटींग क्लबच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत ऐतिहासिक बाजी!*



लोणी :- ( रूपाली भालेराव ) जळगाव जिल्ह्यासाठी आणि विशेषतः पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरलेल्या एका उल्लेखनीय सोहळ्यात, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटींग क्लबच्या गुणी खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा पटलावर आपला दबदबा निर्माण केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २९ ते ३१ मे २०२६ दरम्यान रोलर रीले स्केटींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ४७ व्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत या चिमुकल्या खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. देशभारतून आलेल्या नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अटीतटीच्या व चुरशीच्या स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली आणि जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावले.
या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे ३०० ते ४०० दर्जेदार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या लढतीत जळगाव जिल्हा पोलीस स्केटींग ग्राऊंडवरील प्रतिभावान खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे, चपळाईचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे दर्शन घडवले. यामध्ये रिले १, रिले २ आणि १०० मीटर स्प्रिंट रेस या अत्यंत वेगाच्या व तांत्रिक प्रकारांमध्ये जळगावच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंची नावे आणि त्यांची कामगिरी अत्यंत गौरवास्पद आहे; यामध्ये विराज साळवे यांनी २ गोल्ड व १ सिल्व्हर, आरोही गोसावी यांनी १ सिल्व्हर, मिट्टी भोळे यांनी १ सिल्व्हर व १ ब्रॉंझ, लावण्य भोळे यांनी २ गोल्ड, रसिक पवार यांनी २ गोल्ड व १ सिल्व्हर, राजवीर पवार यांनी २ गोल्ड व १ सिल्व्हर, देविक साळुंखे यांनी १ गोल्ड व १ ब्रॉंझ, तर तन्मय सोनवणे यांनी १ गोल्ड व १ ब्रॉंझ पदक पटकावून नेत्रदीपक यश मिळवले.
या ऐतिहासिक यशामागे खेळाडूंची कठोर मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शक प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटींग ग्राउंडवरील या सर्व विजयी खेळाडूंना स्केटींग प्रशिक्षक जागृती काळे-महाजन, अश्विनी निकम जंजळे यांच्यासह प्रशिक्षक स्वप्नील निकम यांचे बहुमूल्य व तज्ज्ञ मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर ही सुवर्णमयी कामगिरी करणे शक्य झाले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय व प्रेरणादायी यशाबद्दल पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभिमान कौतुक केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक चाळीसभाग विभाग अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव विभाग नितीन गनापुरे, पोलीस अधीक्षक गृह प्रदीप ठाकूर, वेल्फेअर पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांनी सर्व विजयी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ व कौतुकास्पद शब्दार्ने सत्कार केला. तसेच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणखी उच्च शिखर गाठण्यासाठी सर्व खेळाडूंना दिलखुलास शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे (मानव संसाधन विभाग) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, या मुलांच्या यशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा उपक्रमांना एक नवी ओळख मिळवून दिली असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून या चिमुकल्या खेळाडूंवर आणि त्यांच्या मार्गदर्शकांवर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 सत्तेचा महासंग्राम ----
 प्रतिनिधी - रूपाली भालेराव 
 सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर

Post a Comment

0 Comments