प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी करणारे पाच आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची शिताफीने कारवाई-----



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१५-- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड मार्गे जिल्हा जळगाव, अमळनेरच्या दिशेने अख्तर खान शामिन खान पठाण, वय ५२ वर्षे, रा. मोहम्मदीनगर ऊन पाटिया, तालुका-जिल्हा सुरत, (राज्य गुजरात) हा आपल्या साथीदारांसह ईरटीका वाहनातून धारधार असलेल्या तलवारी व इतर शस्त्राची अवैध रित्या तस्करी करणार आहे. 

माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना झाले. पथकाने कोणतीही चाहूल लागू न देता छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड रोडवरील पोलीस स्टेशन वडोदबाजार हद्दीतील पाथरी टोलनाका येथे दि.१३ सप्टेंबर रोजी सापळा रचला. रस्त्यावर वाहतुकीचा कृत्रिम अडथळा तयार करून पथक संशयित वाहनाच्या प्रतीक्षेत असतानाच माहितीतील ईरटीका वाहन येताना दिसताच पथकाने तत्काळ वाहन अडवून त्यातील व्यक्तींना शितफिने सुरक्षितपणे ताब्यात घेतले. 
यानंतर पथकाने ईरटीका वाहन क्रमांक एम एच ०५ इ ए ५२४८ ची झडती घेतली. वाहनाची पाहणी करत असताना पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बरणीत एक जिवंत कासव आढळून आले. कासव बाळगण्याबाबत तसेच त्याची वाहतूक करण्याबाबत आरोपींकडे वैध परवाना अथवा कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी करून पैशाचा पाऊस व गुप्त धनासाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न होत असल्याने वाहनातील अख्तर खान शामिन खान पठाण, वय ५२ वर्षे, रा. मोहम्मदीनगर ऊन पाटिया, तालुका-जिल्हा सुरत, (राज्य गुजरात), शेख अब्रार अहमद मोहिनुद्दीन शेख, वय ३१ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, भंडारकर गल्ली, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, साबीर खान अहमद खान मेवाती, वय ४५ वर्षे, रा. सारबोटे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, शेख मुख्तार शेख शहाबुद्दीन, वय ३४ वर्षे, रा. भंडारकर गल्ली, अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव सय्यद अब्रार अली रोशन अली, वय ३४ वर्षे, रा. कासोद, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव या पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले .दरम्यान सदर कासव नेमक्या कोणत्या प्रजातीचे आहे, याची पडताळणी वनविभागाच्या तर्फे करण्यात आली असता सदर कासवाची प्रजाती प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले.यावरून पोलीस स्टेशन वडोदबाजार येथे आरोपींविरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कासव कुठून आणण्यात आले, त्याची तस्करी करण्यामागील नेमके कारण काय आहे, तसेच या तस्करीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस स्टेशन वडोदबाजार अधिकारी करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक लहु घोडे यांच्यासह पोहेकॉ/विठ्ठल डोके, विजय धुमाळ, महेश बिरुटे, सनि खरात, संदिप कोळगे, योगेश तरमळे व जिवन घोलप यांनी केली.
--------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया :- सदर तस्करांकडून हस्तगत करण्यात आलेले कासव हे इंडियन सॉफ्ट सेल टर्टल ( शास्त्रीय नाव-लीथ नील सोनिया गंगेटीका ) या भारतीय प्रजातीचे गोड्या पाण्यातील असून ते भारतीय वन्यजीव अधिनियम १९७३ च्या वनसंरक्षक कायद्याने अनुसूची क्रम एक मध्ये संरक्षित वन्यजीव असून ते साइट्स या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ही संरक्षण प्राप्त असून जागतिक स्तरावर आय.यु.सी.एन .च्या यादीत रेड कार्ड मध्ये संकटग्रस्त ( इनडेंजर्ड) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. जल परिसंस्थेमध्ये या कासवाची महत्त्वाची भूमिका ही" स्कॅवेंजर्स ( स्वच्छता रक्षक) म्हणजे पाण्यातील मृत झालेले सेंद्रिय घटक व कुजलेले पदार्थ खाऊन जल संस्थेचे आरोग्य सुदृढ ठेवणे व अन्नसाखळी अबाधित राखणे असा आहे. भानामती व अंधश्रद्धेपायी या कासवाची मोठ्या प्रमाणात तस्करी व हत्या होते.  (सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे यांच्या माहितीनुसार सदर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
             
                          डॉ.संतोष पाटील, वन्यजीव संवर्धक, सिल्लोड.

Post a Comment

0 Comments