श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट, २०२६ रोजी सुरु झालेल्या पारायण सोहळयाची सांगता आज ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्हापुर यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली.
दिनांक २० ऑगस्ट पर्यंत चाललेल्या या पारायण सोहळयामध्ये शिर्डी व पंचक्रोशितील सुमारे ८ हजार २०० पारायणार्थी सहभागी झाले होते. काल दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन, ग्रंथ समाप्ती झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची पुजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांचे हस्ते करणेत आली. त्यानंतर दुपारी ०२.०० वाजता श्री साईसच्चरित पारायण समाप्तीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारीक संबळ वाद्यांचे १०-१२ पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे ३ धार्मिक देखाव्यांचे चित्ररथ व विषेश आकर्षण रंजीनी आर्टस, मालाप्पुरा, केरळ यांचे पारंपारिक वाद्य व दाक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे आदींचा समावेश होता.
तर, आज सकाळी १० ते १२ यावेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्हापुर यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख विष्णु थोरात, संक्षण अधिकारी रोहीदास माळी, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी आदींसह पारायणार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तर, सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्हापुर यांचे भारुड कार्यक्रम होईल.
0 Comments