मुंबई येथील साई भक्तांची साईसेवा म्हणजे जाज्वल्य आणि निस्सीम भक्तीचे प्रतीक--- पंडित वाघिरे



शिर्डी (प्रतिनिधी)-राहता तालुक्यातील गणेश नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी मुंबई आणि ठाणे येथील साईभक्त शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी सोहळा घेऊन शाळेत आले. येताना साईभक्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या रूपात साईबाबांना पाहतात आणि म्हणून जवळजवळ दोन लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ उपस्थित होते. कोल्हार येथील व्यापारी कैलास पटेल आणि दिलीप पटेल यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारचे मिष्टान्न भोजन देण्यात आले. गटविकास अधिकारी म्हणाले, मुंबई आणि ठाणे येथील साईभक्त गेले नऊ वर्षापासून या शाळेमध्ये पालखी सोहळा घेऊन येतात आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देतात म्हणजे येथील साईभक्तांची सेवा ही खरोखर जाज्वल्य आणि निस्सीम त्यागाचे प्रतीक आहे .सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वर्गीय भाऊसाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ शहाणे आणि वाघ परिवाराच्या वतीने शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना तसेच प्रत्येक वर्गातील एक आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना रोख स्वरूपात बक्षीस वाटप करण्यात आले. रोख स्वरूपातील बक्षिसांची रक्कम एकूण 17600 रुपये होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून दत्तगुरु पतसंस्थेचे सोपानकाका कासार, कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, सरपंच सुनीता कासार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोहिणी घोगळ, राजेंद्र जाधव, विजय सदाफळ ,भारती मोहन, मनीषा खरात ,जयंत गिरमे, अशोकराव कदम ,कविता कदम ,किशोर कदम उपस्थित होते .कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी गुरुपौर्णिमा आणि साईबाबांचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून शाळेत चालू असणाऱ्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. सदर प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, केंद्रप्रमुख सचिन घुसळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय घोलप, सुनील लोमटे,साईभक्त आशुतोष शहाणे, प्रवीण भावसार, सौरभ वाघ हे देखील उपस्थित होते. सदर प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींच्या वतीने आलेल्या प्रत्येक साई भक्तांचे कुमकुम तिलक लावून आणि लेझीम पथकाच्या जयघोष करून स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारे आणि सबका मालिक एक असा संदेश जगाला देणाऱ्या साईबाबांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास चिंधे यांनी तर आभार प्रदर्शन वेरोनिका गायकवाड यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले.सदर प्रसंगी शाळेतील शिक्षक सुनील गायकवाड, सुनीता गागरे, सोनल भावसार ,मनीषा डोंगरे, भाऊसाहेब सहाणे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments