साक्षी बर्डे या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करा- ज्ञानेश्वर अहिरेअन्यथा राहुरी पोलीस स्टेशन समोर आंदोलन

राहुरी ( प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु.साक्षी किशोर बर्डे या विद्यार्थिनीला आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करा अन्यथा राहुरी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केले जातील असा गंभीर इशारा आदिवासी बचाव समितीच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना देण्यात आला आहे.
    अपर ‌पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आदिवासी बचाव समितीने म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण ही मुलगी अतिशय तणावपूर्ण अवस्थेत जीवन जगत होती. तिच्या मृत्यूस जो नराधम जबाबदार आहे तो अद्यापही मोकाटच आहे. सदर घटना सोमवारी घडली असतानाही व पोलिसांना या मुलीच्या नातेवाईकांनी सर्व माहिती दिली असतानाही राहुरी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे राहुरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आदिवासी विद्यार्थिनीला एका नराधमांकडून खूप त्रास दिला जात होता. ती ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या आवारात जाऊन या मुलीची छेडछाड केली जात होती.

 सदर प्रकार या मुलीने शाळेतील मुख्यध्यापिकेला देखील सांगितला होता परंतु शाळेने कोणतीही दखल घेतली नाही तसेच वेळोवेळी रस्त्यात अडवून धमकी दिली जात होती. हा सर्व त्रास ही मुलगी सहन करत होती. शेवटी या मुलीने त्रास सहन न झाल्याने आपली जीवन यात्रा संपवून घेतली. या मुलीच्या पालकांनी पोलिसांना आरोपीचे नाव व पत्ता सांगितला आहे तरीही पोलीस गप्प का आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आरोपीला का पाठीशी घालत आहेत. तसेच ज्या शाळेत या मुलीची छेडछाड झाली त्या शाळेने वेळीच पोलिसांना का माहिती दिली नाही. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. तरी राहुरी पोलिसांनी तत्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करावा अन्यथा गुरुवार ६ ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आदिवासी बचाव समितीच्या वतीने तीव्र ‌निदर्शने केली जातील व जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आदिवासी बचाव समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी ज्ञानेश्वर अहिरे, शिवाजीराव गांगुर्डे, कैलास माळी, देविदास पवार,अनिल बर्डे, राधाकृष्ण बर्डे, हनीफभाई पठाण,गोरख मोरे आदीं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments