जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जि.प केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांना फोटोग्राफीच्या करिअरच्या संधींसह विविध पैलूंचे मार्गदर्शन




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१९-- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे जागतिक छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात आणि नाविन्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. छायाचित्रण ही केवळ क्षण टिपण्याची कला नसून सजनशीलता, निरीक्षणशक्ती, तंत्रज्ञान आणि करिअरची संधी देणारे प्रभावी माध्यम आहे, याची विद्यार्थ्यांना यावेळी उत्स्फूर्तपणे जाणीव करून देण्यात आली.

याप्रसंगी शाळेचे कला निदेशक विवेक महाजन यांनी विद्यार्थ्यांना छायाचित्रणाच्या विविध पैलूंची रंजक पद्धतीने माहिती दिली. फोटोग्राफीची सुरुवात, विविध प्रकारचे फोटोग्राफी क्षेत्र, निसर्ग व प्राणी छायाचित्रण, न्यूज फोटोग्राफी, सामाजिक विषयांवरील छायाचित्रण तसेच दैनंदिन जीवनातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी छायाचित्रणाचा कसा उपयोग करता येतो.एक छायाचित्र हजार शब्द सांगू शकते! या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना छायाचित्रामागील विचार, निरीक्षण आणि संदेश समजावून सांगण्यात आला. तसेच फोटोग्राफी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि प्रत्यक्ष अनुभव सांगत विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहलाला नवी दिशा देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि अभिव्यक्ती कौशल्यांना चालना मिळाली. शालेय जीवनात अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध क्षेत्रांची ओळख करून देण्याचा एक सुंदर प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हरिदास काटोले, किरणकुमार पाटील, श्रीमती सुरेखा चौधरी, रामचंद्र महाकाळ,श्रीमती मंगला बोरसे,श्रीमती सविता पाटील, श्रीमती कोळी, गणेश बाविस्कर, अंकुश काळे, अनिल देसाई, तानाजी चव्हाण, विकार सर, बागवान आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments