लोणी प्रतिनिधी : शंकर सोनवणे
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वादनगर परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी कारवाई करत सलग तीन दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत इंडियन पोल्ट्री फॉर्म, भारत ॲग्रो आणि साई माऊली किराणा या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि रोख रकमेवर हात साफ केला. एकाच रात्री सलग तीन दुकाने लक्ष्य केल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दुकाने फोडून चोरी केली. चोरीनंतर ते पसार झाले; मात्र त्यांची हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. चोरीला गेलेल्या रोख रकमेचा व इतर ऐवजाचा नेमका तपशील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अलीकडच्या काळात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडण्याच्या घटनेने लोणी परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आशीर्वादनगरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडून रोख रकमेवर डल्ला; सीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत
चौकट :
♦️मध्यरात्री १.३० वाजता चोरीची घटना
♦️आशीर्वादनगरमधील सलग तीन दुकाने लक्ष्य
♦️रोख रक्कम चोरी; ऐवजाचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार
♦️चोरटे सीसीटीव्हीत कैद; लोणी पोलिसांचा तपास सुरू.
0 Comments