देव तारी त्याला कोण मारी! जंगलातांडा येथे गटारी सापडले जिवंत नवजात शिशु, तालुक्यात खळबळ -----



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२०-- सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या गटारीत दि.२० गुरुवारी पहाटे सहा साडे सहा वाजेच्या सुमारास जिवंत नवजात शिशु सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार यांनी तात्काळ फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर मोटे यांना घटनेची माहिती दिली.विलंब न करता सपोनी सुधीर मोटे,सहकारी यांनी नवजात शिशु ला उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दाखल केले.
       याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा येथील बसस्थानकाच्या बाजूला काही नागरिकांना बाळ रडण्याचा आवाज आला.शोध घेण्यासाठी नागरिक रडण्याच्या दिशेने गेले असता बसस्थानकाजवळ असलेल्या गटारीत अंदाजे तीन ते चार तासाचे स्री जातीचे जिवंत नवजात शिशु आढळून आले.याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार यांनी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर मोटे यांना दिली.दरम्यान पोलिस येईपर्यंत उपस्थित नागरिकांनी आशा सेविका उषाबाई राठोड यांना तात्काळ घटनास्थळी बोलावले. आशा सेविका हिने नवजात शिशु ला स्वच्छ केले. व पोलिसांच्या मदतीने नवजात शिशु ला सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत पाटील, परिचारिका श्रीमती एम.आर.हिवर्डे यांनी नवजात शिशु वर प्राथमिक उपचार केले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.केतन काळे यांनी मार्गदर्शन केले. पुढील उपचारासाठी नवजात शिशु ला आशा सेविका, महिला पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील सामान्य रुग्णालय पाठविण्यात आले. यावेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर मोटे,राहुल नेवरे,संतोष उबाळे ग्रामीण रूग्णालयात उपस्थित होते.दरम्यान रात्री दोन ते चार च्या सुमारास डिलिव्हरी झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.अंदाजे तब्बल तीन तास नवजात शिशु गटारीत पडून असल्याने कोणतीही इजा न होता नवजात शिशु जिवंत असल्याने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय पहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments