पक्षांना कुपोषणाचा धोका, पर्यटन स्थळी वन्य जीवांना प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ घालणे वन्य जीवांना धोकेदायक, आंधळे निसर्ग प्रेम नको-अभ्यासकांचा सल्ला ----




दिलीप शिंदे
सोयगाव दि.३१-- अजिंठा, वेरूळ, दौलताबाद ,म्हैसमाळ, सारोळा व इतर पर्यटन स्थळी पावसाळी पर्यटनासाठी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अजिंठा लेणीच्या वर असलेल्या धबधब्याच्या बाजूला बहुतांश पर्यटक आपल्या सोबत चिप्स- कुरकुरे ,चिवडा, खारवलेले शेंगदाणे ,वाटाणे , भजे, ब्रेड पकोडे व तत्सम प्रक्रिया केलेले सुटे व पाकीट बंद अन्नपदार्थ सोबत आणतात व ते हौसेने जमिनीवर फेकतात व येथील माकड, खार ,बुलबुल ,सात भाई ,मैना, दयाळ इत्यादी पक्षी खाण्यासाठी त्यावर तुटून पडत असल्याचा अनुभव बऱ्याच पर्यटन स्थळी नित्याचा झाला आहे. 

सदर प्रक्रिया केलेले तेलकट, खारट व रासायनिक प्रिझर्वेटिव्ह असलेले पाकीट बंद व इतर अन्नपदार्थ हे या वन्यजीवांचं नैसर्गिक खाद्य नसून ते त्यांच्या जीवितास हानिकारक असल्याने त्याबाबत सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व वन्यजीव संवर्धक डॉ.संतोष पाटील हे यावर अध्ययन करत आहेत व सातत्याने पर्यटन स्थळी जनजागृती करत आहेत. पाच वर्षांपूर्वी सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगरात तोंडापूर लगत दोन माकडांना गुरुद्वाराचा व अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे त्यांनी प्रकाश झोतात आणले होते. त्या मागचे कारण ही प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ माकडांना खाऊ घालने हे होते. दरम्यान बरेचसे पर्यटक अर्धवट ऊघडलेली प्लास्टिकचे रॅपर ज्यात अन्नपदार्थ ठेवलेले असतात ते तसेच फेकून देतात व अनेक पक्षी व इतर वन्य जीव घाईगर्दीमध्ये अन्नासोबत थोडे अधिक प्रमाणात प्लास्टिकच्या वेस्टनाचे तुकडेही गीळतात व ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. जैवविविधता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य पर्यटकांनी टाळावे निसर्ग प्रेम हे डोळस असावे असे डॉ. संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
--------------------------------------------------------------------------------

---- प्रक्रिया केलेले, शिजवलेले, तळलेले अन्नपदार्थ पक्षांसाठी का हानिकारक आहेत-- 
                       १) या प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये मिठाचे म्हणजेच सोडियमचे प्रमाण अत्याधिक असते, त्याचे सेवन पक्षांनी केल्यास त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डीहायड्रेशनची अवस्था उद्भवते व त्यामुळे त्यांचे मूत्रपिंड निकामी होऊन अकाली मृत्यू येण्याची शक्यता बळावते. २) तळलेले तेलकट पदार्थ पक्षी व इतर वन्यजीवांनी सतत खाल्ल्यास त्यांचे वजन अवास्तव वाढते व त्यांची उडण्याची क्षमता कमी होऊ शकते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने पक्षी व इतर वन्यजीवांच्या लिव्हर ( यकृत) मध्ये चरबीचे प्रमाण अत्याधिक ( फॅटी लिव्हर)होते ज्यामुळे त्यांचे आयुष्य धोक्यात येते.
                ३) बुलबुल , मैना ,स्वर्गीय नर्तक या सारखे पक्षी हवेत उडणारे कीटक पकडण्यास निष्णात असतात मात्र अशा प्रकारे आयते अनैसर्गिक खाद्य मिळाल्यास हे पक्षी आपली शिकार शैली विसरतात. कीटक भक्षी असणारे ही पक्षी निसर्गामध्ये नैसर्गिक कीड नियंत्रण करण्यास मदत करतात मात्र जर आपण त्यांना असे आळशी बनवले तर ही क्रिया विस्कळीत होईल. ४) सतत तेलकट खाद्यपदार्थांचा संपर्क या पक्षांच्या पीसांशी आल्यास त्यांची पिसे अधिक तेलकट होतात व त्या पिसांवरील नैसर्गिक संरक्षक प्रिन ग्लँड शिल्ड हे आवरण नष्ट होते.                         
              ५) खाद्यपदार्थ खाण्यासाठी एकाच जागी विविध प्रजातीचे पक्षी खूप मोठ्या संख्येने गर्दी करतात त्यात कबुतरांचा भरणा ही मोठा असतो. अशा या गॅदरिंग मुळे "एव्हीएन बर्ड फ्लू व्हायरस" या विषाणूंचा संसर्ग -प्रादुर्भाव इतर पक्षांना होतो व हा आजार पक्षांसाठी प्राणघातक ठरतो.      
            ६) पर्यटन स्थळी जिथे अशा प्रकारे पक्षांचा मेळावा जमतो त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणात विष्ठा पडून मानवासही काही आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. ७) खार आणि पक्षी असे खाद्य खाण्यास माणसांच्या जवळ जातात व बरीच पर्यटक हे पक्षी पकडून पिंजऱ्यात पण ठेवतात किंवा खाण्यासाठी वापरतात. ८) असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने पक्षांची पोट तर भरते मात्र सकस आहार न मिळाल्यामुळे त्यांना कुपोषणाच्या समस्या उद्भवतात.

Post a Comment

0 Comments