भगवंताच्या अखंड नामस्मरण व चिंतनाने जीवनातील सर्व दुःखाचे निवारण होते. - ह.भ.प.मा.मुख्याध्यापक डॉ.अनिल महाराज लोखंडे



राजुरी ( वार्ताहर )राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथून गेल्या पन्नास वर्षांपासून सुरु केलेली पायी दिंडी तिचे चालक ह.भ.प. माधवराव ( भाऊ पाटील ) शिरसाठ,वैकुंठवाशी ह .भ.प . लहानुबाबा झावरे यांच्या अथक प्रयत्नातून अव्याहतपणे चालू असलेली श्री संत सावता महाराज पायी दिंडी व पालखी सोहळा श्री क्षेत्र कोल्हार खुर्द ते पंढरपूर वारीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करून वाटचाल करीत असलेली महिला व पुरुष वारकरी दिंडी "ज्ञानोबा माऊली तुकाराम" जयघोषात पंढरपूरकडे विठूमाऊलीच्या दर्शन भेटीला दिंडी व्यवस्थापक ह .भ .प .शंकर महाराज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली आहे ,


 (अंबिलवाडी) रुईच्छत्तीसी येथे दुपारी विश्रांतीसाठी दिंडी आली असताना अन्नदाते ह .भ .प .मधुकर महाराज वाबळे यांचे निवासस्थानी भोजनापूर्वी पर्यावरण प्रेमी व प्रबोधनकार ह.भ .प डॉ.अनिल लोखंडे महाराजांनी कलमी आंब्याची रोपे त्यांना भेट दिली आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करून "झाडें लावा, झाडें जगवा,वसुंधरा वाचवा" असा पर्यावरणीय महत्व पटवून देणारा संदेश दिला. प्रवचनरुपी पुष्प गुंफताना अनिल लोखंडे यांनी सांगितले की आपल्या साधूसंतांनी सर्वसामान्यांना ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी सोपा मार्ग सांगितला तो म्हणजे भगवंताच्या अखंड चिंतन व नामस्मरणाने आणि त्याला अनन्य भावाने शरण गेल्यास तो भक्ताला कोणत्याही संकटातुन तारतो,त्या जीवाचा उद्धार करतो. उदा.गजेंद्र,नरकासुर , पांडव अज्ञातवासात असताना महर्षी वशिष्ठानी शिष्यांसह भोजनप्राप्तीसाठी घेतलेली परीक्षा,संत कुर्मदास, संत सावता महाराज यांनी अखंड नामस्मरणाने ईश्वर प्राप्ती करुन घेतली. असे अनेक दाखले देत भगवंताच्या लिलांचे महत्व पटवून दिले. पंढरीच्या वाटेवर असताना सतत काया, वाचा, मनाने भगवंत चिंतन घडावे व ईश्वराचा गोड आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा असे मार्गदर्शन केले.तसेच वारकरी व व्यवस्थापकांना पुढील प्रवास सुखकर होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रवचन सेवा दिल्याबद्दल आणि दिंडीकरिता सालाबादप्रमाणे अन्नदानास भरीव देणगी दिल्याबद्दल गेल्या पंधरा वर्षांपासून चालू असलेली परंपरा तसेच स्वखर्चाने जिथे मिळेल तेथे प्रवचन सेवा देणे, दिंडीला भेट व भरीव देणगी देणे याबद्दल दिंडी व्यवस्थापकांनी ह .भ. प. डॉ. अनिल महाराज लोखंडे यांचा "श्री संत शिरोमणी सावता महाराजांची छान फोटो प्रतिमा" ,श्रीफळ आणि स्वलिखित "श्री संत सावता महाराज प्रासादिक नित्य नैमित्तिक भजनी मालिका" भेट देऊन यथोचित सन्मान केला. ह .भ.प.शंकर महाराज लोखंडे यांनी श्री अनिल लोखंडे यांचे चालू असलेले अध्यात्मिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन जनजागृती , विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन व पालकांना संस्कारक्षम पाल्य घडवण्यासाठी समुपदेशन अशा सामाजिक कार्याचा आवर्जून उल्लेख करून गौरवौदगार काढले .यावेळी ह भ प अनिल पाटील, विणेकरी ह.भ.प.रेवन्नाथ पा सिरसाठ, ह भ प जगन्नाथ पा घोगरे, भास्करराव घोगरे, ह भ प निलेश महाराज शिरसाठ, ह.भ.प.धनंजय टाकसाळ, मृदूंगाचार्य सुधाकर महाराज घोगरे, गायनाचार्य मुकुंद महाराज भगत , ह भ प दिलीप सिरसाठ , एकाच कुटुंबातील तीन पिढ्यासोबत नातू मुलगा व आजोबा एकाच दिंडीत सहभागी असलेले ह भ प केरुजी महाराज घोगरे , सीताराम पठारे कोल्हार ,बेलापूर, केसापूर परिसरातील वारकरी , दिंडीचे अन्नदाते मधुकर महाराज वाबळे , ह भ प वाबळे बाबा व त्यांचा परिवार,आचारी,सेवेकरी, महिला व पुरुष वारकरी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments