प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे भंडारदरा व अकोले तालुक्यातील १२‌०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप



प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे भंडारदरा व अकोले तालुक्यातील १२‌०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजुरी (वार्ताहर)- अकोले या आदिवासी तालुक्यातील भंडारदरा व परिसरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील १२‌०० गरजू विद्यार्थ्यांना लोणी (ता. राहाता) येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आदिवासी भागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.

 याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षीही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्याची मदत पुरवण्यात आली.
या वाटप कार्यक्रमास स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. सुनील अरसुडे, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक अमोल सरगर, सुनील व्यवहारे, मनोज गाडेकर, रोहित तांबे, मंगेश सातपुते आदी उपस्थित होते.
भंडारदरा परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा, भंडारदरा कॉलनी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलनी, शेंडी, बारी बंगला, जहागीरदारवाडी, बारी, पेंडशेत, मुतखेल दरेचीवाडी, केलटेंभे, तीर्थाचीवाडी, कोल्हाटवाडी, साम्रद, लव्हाळवाडी, शिंगणवाडी, आदरवाडी पांजरे, बांगरवाडी, शाळेचीवाडी, राजवाडा मुरशेत अशा एकूण २१ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
केवळ शैक्षणिक उपक्रमच नव्हे, तर प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजूर आणि भंडारदरा येथे आदिवासी आरोग्य केंद्र आणि फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक) चालवले जाते. याशिवाय डोंगराळ व दुर्गम भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी विशेष मोटर बाईक ॲम्बुलन्स सुविधा अविरतपणे सुरू आहे.

Post a Comment

0 Comments