करमाळा ( राजकुमार गडकरी)--
-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारातूनच वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ‘वारी’ वरुनच ‘वारकरी’ या शब्दाचा उदय झालेला आहे.
वारी या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझारा या अर्थाने देखील घेतला जातो. वारकऱ्यांना माळकरी म्हणून देखील ओळखले जाते. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मण्यांची माळ घातलेली असते. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ टाकल्याशिवाय कुणालाही वारकरी होता येत नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरुप झालेला हा वारकरी संप्रदाय अशीच ओळख कायम झाली आहे. इतक या वारकऱ्यांच आणि विठ्ठलाच नात घट्ट झालेल आहे.
वारकरी संप्रदायाने जितके महत्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलेले आहे तितके महत्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायात वर्षातील दोन वाऱ्यांना अनन्यसाधारण असे महत्व देण्यात आले आहे. एक आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी कार्तिकी शुद्ध एकादशी. या दोन्ही एकादशीला वारकरी आपल्या गावाहून पायी पालखी, दिंडी घेऊन निघतात. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होऊन चंद्रभागेत स्नान करतात आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. याचबरोबर शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशीला देखील वारकरी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. वारकऱ्याने वर्षातून किमान एकतरी वारी करावी असे संप्रदायात नमूद करण्यात आले आहे.
वारकरी संप्रदाय कधी अस्तित्वात आला हे अजूनही माहीत नसले तरी, देखील वारीची आणि संप्रदायाची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालू असल्याचे अनेक दाखल्यांवरुन निष्पन्न झाले आहे. ज्ञानोबारायांचे वडील देखील नियमित वारी करत असल्याचे दाखले मिळालेले आहेत. यामुळे वारकरी संप्रदायाला आणि वारीला आठशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असल्याचे सिद्ध होते. वारकरी संप्रदाय जातीपाती प्रांत याच्या पलीकडे जाऊन आपल्या संप्रदायाची पताका डौलाने फडकवू लागला. यामुळेच वारकरी संप्रदायाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. अशापद्धतीने वारकरी संप्रदाय रुजत गेला आणि आता वारीला देखील सातासमुद्रापार ओळख मिळाली. यावर्षी तर लंडन येथून श्रीक्षेत्र पंढरपूरला दिंडी येत आहे. तर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक व शेजारच्या राज्यातूनही छोट्या मोठ्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे येत आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर कडे येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांनी गजबुजून गेले आहेत. आमचे श्री सद्गुरु नारायणगिरीजी महाराज दिंडी ही निमगाव डाकू येथून निघून चापडगाव येथे सकाळी आली .येथे भजन व चहा नाश्ता झाला. त्यानंतर दिंडी ही करमाळ्याकडे रस्त्याने जात असताना केशवराव होन भेटले. त्यांनी दिंडीला भेट दिली. त्यावेळी त्यांचा दिंडीतर्फे सत्कार करण्यात आला. नंतर दिंडी पुढे जात असताना देवगाव तालुका नेवासा येथील दिंडीमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे होते त्यांचीही भेट झाली. जय हरी झाला. पुढे जात असताना जातेगाव शिवारात मध्ये दुसऱ्या एका दिंडीतील वयस्कर वारकऱ्याचा मोटरसायकलने धडक दिल्यामुळे अपघात झाला .पायाला जबर मार लागला. त्याचवेळी अनेक दिंड्या पंढरपूर कडे जात असताना रस्त्याने कार मध्ये सोनई येथील डॉक्टर बाबासाहेब शिरसाठ हे जात होते. त्यांनी अपघाताची गर्दी पाहून ते थांबून अपघातग्रस्त वृद्धाला त्यांनी आपल्या कारमधून सर्वसामान कडून वैद्यकीय मदत केली. मीही तेथे होतो.त्यांचे सर्व वारकऱ्यांनी धन्यवाद मानले. तोपर्यंत आमची दिंडी पुढे गेली होती. आमची दिंडी जातेगावच्या पुढे शिवारात आल्यानंतर तेथे एका वस्तीवर स्वयंपाक बनवून महाप्रसाद झाला. तेथील हॉटेल व वस्ती वाल्याने ------पुढची पंगत घेतली. त्यांचा दिंडीतर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिंडी करमाळा कडे आली. आमच्या दिंडीने आज सोमवार रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला.अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्गावर असणाऱ्या करमाळा या मोठ्या शहरांमध्ये अनेक दिंड्या मुक्कामी येत असून करमाळ्याकडे येणारे रस्ते ही हरिनामाने गजबजले आहे. करमाळा शहराच्या अलीकडेच बायपास असून काही दिंड्या बायपासने पुढे जात आहेत तर काही शहरांमध्ये मुक्कामी थांबत आहेत. करमाळा शहरातील नागरिकही शहरात येणाऱ्या प्रत्येक दिंडीचे जोरदार स्वागत करत आहेत. ठीक ठिकाणी मुक्कामाची चहा नाश्ता,महाप्रसादाची सोय येथील विविध संघटना, सामाजिक संस्था यांच्यातर्फे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक दिंड्या करमाळा येथील प्रसिद्ध अशा श्री कमलादेवी मातेच्या मंदिराकडे मुक्कामी जात आहेत.
सर्वच दिंड्यांमधील असंख्य वारकरी देवीचे दर्शन घेऊनच पुढे जात आहेत. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्याचा मुक्काम करमाळा येथील श्री हनुमान मंदिरात होता.येथील ह भ प मनोज धोंडीबा पवार साहेब यांच्यातर्फे दिंडीला महाप्रसाद तर श्रीमती कविताताई अंधारे यांच्यातर्फे चहा पाण्याची सोय आहे . करमाळायेथे ह भ प मनोज धोंडीबा पवार साहेब यांच्या बंगल्यामध्ये हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम दिंडी तर्फे झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ह भ प मनोज धोंडीबा पवार यांचा दिंडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.व धन्यवाद मानण्यात आले. दिंडीचा करमाळा येथे मुक्काम होता .अनेक दिंड्या करमाळ्यात मुक्कामी होत्या. त्यामुळे करमाळा शहर हरिनामाने गजबजुन गेले होते.
0 Comments