सोयगाव तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार, नैसर्गिक आपत्ती नियत्रंण कक्ष कागदावरच!, जनजीवन विस्कळीत---

 

दिलीप शिंदे 
सोयगाव दि.३१ -सोयगाव सह तालुक्यात दि.३० गुरुवारी पहाटे सात वाजेपासून सुरु झालेल्या रिमझिम व संततधार पावसाने शुक्रवार पर्यंत जोर वाढवून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कमी अधिक जोरात संततधार झालेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत असल्याने सोयगाव - बनोटी रस्त्यावरील सुरू असलेल्या घोसला,जरंडी,महादेव मंदिराजवळील पुलांच्या कामाचे ठिकाणी असलेला वळण रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

काही भागात रस्त्यावर गुडघ्यावर पाणी साचले होते.शहरातील सोना नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची लोखंडी असारी बाहेर निघालेली असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे. दरम्यान तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शेतात पाणीच पाणी साचून कोवळी पिके पाण्यात बुडाली आहे काही भागात शेती पाण्यात गेली आहे.दरम्यान गुरुवार पासून सुरू झालेल्या पाऊस शुक्रवारी ही सुरूच होता. सोयगाव तालुका हा डोंगराळ भागा लगत वसलेला असल्याने पावसाळ्यात प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक असताना देखील तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी नैसर्गिक आपत्ती नियत्रंण कक्ष स्थापन केला असून यात नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी आपत्ती नियंत्रण कक्षात गैरहजर राहत असल्याने नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.सतत दोन दिवसापासून सोयगाव तालुक्यात पाऊस सुरू असून देखील दि.२९ तारखेला आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्ती असलेले संतोष पडघम (कनिष्ठ सहाय्यक पंचायत), दि.३० तारखेला युसूफ सय्यद (सहाय्यक एकात्मिक बाल विकास),संजय साठे (महसूल सेवक) हे गैरहजर होते.तहसीलदार दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याने दांडी बहाद्दरांची संख्या वाढली आहे. दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना तहसीलदार का पाठीशी घालत आहे हे मात्र निरुत्तरित आहे. 

सोयगाव तालुक्यातील मंडळ निहाय झालेले पर्जन्यमान 

--------------------------------
१)सोयगाव मंडळ:- १४५. एम एम (५९९)     
२)बनोटी मंडळ:- ४५. एम एम (३४४)        
३)सावळदबारा मंडळ :- ९५. एम एम (४१३)   
४)जरंडी मंडळ:- १४५. एम एम (६२५)  
 
            एकूण:- ४३०. एम एम (१९८१)   
--------------------------------
शुक्रवार सरासरी :- १०७.५ एम एम 
आता पर्यंतची सरासरी :- ४९५.२५ एम एम

Post a Comment

0 Comments