श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळवार दिनांक २८ जुलै ते गुरुवार दिनांक ३० जुलै २०२६ याकाळात श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थाकडून १,६६,५६० भक्तमंडळ सभासदांना श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेल्या असून SMS व इ-मेलद्वारे ३,५२,८२३ देणगीदार साईभक्तांना आंमत्रित करण्यात आलेले आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई तर बैंगलोर येथील दानशुर साईभक्त एस. प्रकाश यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. फुलांच्या सजावटीमध्ये वेगवेगळ्या देशी व विदेशी प्रकारच्या फुलांच्या समावेशातून श्री साईबाबांची प्रतीमेसह हत्ती व विविध प्रकारचे पक्षी साकारण्यात येणार आहेत. तसेच उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री गाडीलकर म्हणाले, गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबा हयातीत असलेपासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी श्री गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ४५ पालख्यांनी नोंदणी केलेली आहे.
उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी, तसेच भाविकांचे पावसापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्थान परिसरात सुमारे ६८ हजार चौ.फुट मंडप उभारण्यात आलेला आहे. तसेच साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थे करीता साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे २८ हजार चौ.फुट निवासी पावसाळी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये विद्युत, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. पुणे ते शिर्डी पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय सुयोग्य होण्यासाठी पालखी थांब्याच्या ठिकाणी सुमारे ३२ हजार ५५० चौ.फुट पावसाळी मंडप उभारण्यात आलेला आहे. तसेच पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
उत्सव काळात श्री साईप्रसादालयात तीन दिवसीय उत्सवात वेगवेगळे मिष्ठान्न प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, श्री साईआश्रम (१००० रुम) व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहीका ही तैनात करण्यात आलेल्या आहेत. भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन संस्थानच्या जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी विविध ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी संस्थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्थान, पोलिस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
उत्सव कालावधीतील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. उत्सवाच्या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्या पोथी व प्रतिमा मिरवणूक, ०६.०० वा. व्दारकामाई मंदिरामध्ये श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे अखंड पारायणास सुरवात, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे. दु. ०१.०० ते ०३.०० वा. श्री राजेश अरोरा, बाराबंकी यांचा साई भजन कार्यक्रम तर सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. वेदश्री वैभव ओक, डोंबिवली (पु) यांचा कीर्तन कार्यक्रम तर सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत सक्सेना बंधु, दिल्ली यांचा साई भजन हा कार्यक्रम असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची शेजारती रात्रौ १०.०० वा. (पालखी मिरवणूक परत आल्यानंतर) होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी, बुधवार दिनांक २९ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.१५ वा. लेंडीबाग येथे ध्वजपुजन तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत गायिका, संगीतकार व संगीत दिग्दर्शक, डॉ. मोनिका साई, लखनऊ यांचा साई भजन कार्यक्रम, दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत ह.भ.प. वेदश्री वैभव ओक, डोंबिवली (पु) यांचा कीर्तन कार्यक्रम, सायं. ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. तसेच सायं. ०७.३० ते १०.०० यावेळेत प्रसिद्ध गायक, संगीतकार, शैलेंद्र भारती, मुंबई यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणुक होईल. तर रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्यामुळे दिनांक २९ जुलै रोजीची नित्याची शेजारती व दिनांक ३० जुलै रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार, दिनांक ३० जुलै रोजी पहाटे ०६.०० वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. वेदश्री वैभव ओक, डोंबिवली (पु) यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी १२.१० वा. श्रींची माध्यान्ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत निरज शर्मा (टी सिरीज), नवी दिल्ली यांचा साई भजन कार्यक्रम, दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत राज आचार्य, कोलकत्ता साई कि लिला कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते ०९.३० वा. यावेळेत विजय साखरकर, बोरीवली (पु) यांचा साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम होईल. या दिवशी गुरुवार असल्याने रात्रौ. ०९.१५ वा. श्रींचे गुरुवारचे नित्याचे पालखीची मिरवणुक होईल. तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल. किर्तन व निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार असल्याचे ही श्री.गाडीलकर यांनी सांगितले.
उत्सवाचे निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्चरित्राचे अखंड पारायण करण्यासाठी व विणेकरी म्हणून सहभाग घेवू इच्छीणा-या साईभक्तांनी आपली नावे सोमवार दिनांक २७ जुलै रोजी दुपारी ०१.०० ते सायंकाळी ०५.३० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. त्याच दिवशी सायंकाळी ०५.४० वाजता समाधी मंदिरातील मुख दर्शन स्टेजवर चिठ्ठया काढुन पारायण करणा-यांची नावे व उर्वरीत चिठ्ठ्यांमधुन विणाधारकांची नावे निवडण्यात येतील. तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी बुधवार दिनांक २९ जुलै रोजी रात्रौ १०.०० ते ०६.०० वा. यावेळेत होणा-या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्ये त्याच दिवशी आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन सर्व साईभक्तांनी या उत्सवास उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. गाडीलकर यांनी केले आहे.
या वर्षीचा श्री गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.
0 Comments