दिलीप शिंदे
सोयगाव दि.२३-- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान दि.२० सोमवारी झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत गुरुवारी सोयगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद शांततेत पार पडला.पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वाल्मिकनगर , नारळी बाग मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. चौकात झालेल्या सभेत सिद्धार्थ मोरे, रवींद्र काळे, दीपक देशमुख, राजेंद्र काळे, सुभाष जाधव, सुशिला इंगळे, मुकुंदा वाहुळे, अनिल शेळके आदींनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर नायब तहसीलदार संभाजी देशमुख व सपोनि दिनकर गोरे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भीम आर्मी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी संघटना, व्यापारी संघटना, रिपब्लिकन सेना तसेच विविध समविचारी संघटनांचा सहभाग होता. बंद दरम्यान देखील एसटी बससेवा सुरळीत सुरू होती. बसस्थानकावर प्रवाशांसाठी आयोजकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गजानन आरेकर, जिरी,गजानन दांडगे,अजय कोळी,सादिक तडवी,कुणाल जाधव,समाधान बारी आदींसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments