राजुरी वार्ताहर : संगमनेर येथून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या एका ओमनी कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, ३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या गेट नंबर २ समोर हा थरार घडला. सुदैवाने, गेटवरील सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गाडीतील महिला, मुले आणि पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमनी गाडी (क्र. एम.एच. ०४ सी.जे. १२९०) ही लोणीहून संगमनेरकडे जात होती. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या गेट नंबर २ समोरून जात असताना अचानक गाडीच्या वायरिंगने पेट घेतला. काही क्षणातच गाडीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने परिसरात एकच धावपळ व घबराट निर्माण झाली.
गाडीने पेट घेतल्याची बाब गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळ न घालवता इतर सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी बोलावले. रक्षकांनी सर्वात आधी जीवाची बाजी लावून गाडीत अडकलेल्या महिला, लहान मुले आणि पुरुषांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर संस्थेच्या अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आगीवर मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
या थरारक घटनेत फायर ऑफिसर विकास माळी, ए.व्ही. शेळके, जी.डी. कांगणे आणि सुपरवायझर जे.पी. शेख यांनी अत्यंत मोलाचे प्रसंगावधान राखले. त्यांच्या या तत्परतेमुळेच गाडीतील प्रवाशांना एकप्रकारे जीवनदान मिळाले.
आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आणि मोठी दुर्घटना टाळणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, उपसंचालक व्यवस्थापन ध्रुव विखे पाटील, आस्थापना अधिकारी विलास घुले, उपसुरक्षा अधिकारी बापूसाहेब उगले आणि सुरक्षा अधिकारी डी.व्ही. वाकचौरे यांनी या सुरक्षा रक्षकांच्या आणि फायर टीमच्या कामगिरीचे विशेष कौतुक करून त्यांना शाबासकी दिली आहे.
0 Comments