न्यू इंग्लिश स्कूल सावळविहीर बु. येथे शिक्षक-पालक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेशी समन्वय ठेवावा



शिर्डी ( प्रतिनिधी)-
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, सावळविहीर बु., ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता शैक्षणिक वर्ष 2026-27 निमित्त शिक्षक-पालक सभा, माता-पालक सभा व सखी सावित्री सभेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बहुसंख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) व लक्ष्मीवहिनी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब जनार्दन जपे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा माजी उपसरपंच मा. श्री. गणेश नारायण कापसे पाटील तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. श्री. संतोष आगलावे पाटील उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका श्रीमती जाधव ताई यांनीही आवर्जून उपस्थिती दर्शविली.
अध्यक्षीय मनोगतात मा. बाळासाहेब जपे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक समस्या पालकांनी निर्धास्तपणे मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. डहाळे मॅडम यांनी केले. विद्यालयात मिनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, स्पर्धा परीक्षांसाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष तासिकांची तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक संधींची सविस्तर माहिती ज्येष्ठ शिक्षक श्री. काळेगोरे सर यांनी पालकांना दिली.
यावेळी मा. श्री. गणेश नारायण कापसे पाटील यांनी आधुनिक शिक्षणपद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे वाढते महत्त्व आणि बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण घेण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षणासोबत आधुनिक कौशल्यांचा विकास होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री. धीवर सर यांनी प्रभावीपणे केले. सभेदरम्यान पालकांनी विविध शैक्षणिक विषयांवर शिक्षकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही सभा यशस्वी वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बनसोडे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. डहाळे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. म्हस्के सर, श्री. काळेगोरे सर, श्री. इनामके सर, श्रीमती कानडे मॅडम, श्री. धीवर सर तसेच श्री. वाकचौरे सर उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments