दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१ - राज्याचा ग्रीन आंब्रेला (हरित आच्छादन) ३३ टक्के इतका अपेक्षित असल्याने ,तो अनुशेष भरून निघण्यास खरीचा वाटा घेत व हरित महाराष्ट्र व्हावा या उद्देशाने सिल्लोड येथील वृक्ष व वन्यजीव संवर्धक ,अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.संतोष पाटील यांनी "बांध तेथे झाड' हा उपक्रम सिल्लोड तालुक्यात सुरू केला.
असून पहिल्या टप्प्यात हट्टी, बहुली, चिंचपूर ,मोहोळ, अन्वी येथील शेतकऱ्यांना शेतात व घराच्या आसपास , गायरान क्षेत्र, इ ठिकाणी देशी प्रजातीचे मुख्यतः मधमाशा, पक्षी ,फुलपाखरे ,वटवाघळे ,पक्षी ,बीटल्स या वन्यजीवांना उपयुक्त ठरतील अशा २५ प्रजातीच्या २२० भारतीय वृक्ष रोपांचे वाटप केले .वाटप केलेल्या प्रत्येक रोपाचे' इको ऑडिट' करण्यात येत आहे. यात जमिनीचा प्रकार ,पाण्याची व्यवस्था ,झाडावर पडणारे रोग ,झाडाचा फुलण्याचा व फलनाचा कालावधी, त्यापासून मिळणारे बीज संकलन , झाडांवर पडणारी कीड, खोडकीड टी एम व्ही वायरस संसर्ग, आदींचा 'पोर्टफोलिओ ' करण्यात येत असून प्रत्येक झाडाचे 'ऑडिट पेज' बनवण्यात आले आहे. रोपीत वृक्षांची लोक जैव विविधता नोंद वहीत नोंद ही घेण्यात येणार आहे. कार्बन फुट प्रिंट चे मूल्यांकनही समाविष्ट असेल.सिल्लोड ,सोयगाव ,भोकरदन ,कन्नड ,जामनेर ,फुलंब्री या सहा तालुक्यांसह इतर ठिकाणीही या एक वर्षात १५ हजार रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. झाडांचे रोपण कसे करायचे याची शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले असून लावेल त्याचे नव्हे तर जगवेल त्याचे झाड असे हे हरित महाराष्ट्र अभियान आहे असे डॉ. पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले..
0 Comments