'ओ साजणा...' भक्तिगीतातून श्रीकृष्णभक्तीचा जागर; कलाकार व निर्मिती पथकाचा देवस्थान ट्रस्टकडून सत्कार
लोणी प्रतिनिधी : - (रूपाली भालेराव), राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्राचीन, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभव लाभलेल्या धनेश्वर देवस्थानाने धार्मिक परंपरा, संस्कृती आणि आधुनिक कलाविष्काराचा अनोखा संगम घडवून आणत पुन्हा एकदा आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख अधोरेखित केली आहे. श्रीकृष्णभक्तीच्या मधुर भावविश्वाला साकार करणाऱ्या 'ओ साजणा, आता मुरलीची मधुर तान ऐकव ना...' या धार्मिक अल्बम गीताचे चित्रीकरण नुकतेच देवस्थानाच्या पवित्र परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रवरा नदीच्या निसर्गरम्य तीरावर उभे असलेले मंदिर, भव्य घाट आणि आध्यात्मिक वातावरणामुळे या गीताला भक्तिभावाची वेगळीच उंची लाभली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात जीर्णोद्धार झालेल्या धनेश्वर मंदिरासह प्रवरा नदीवरील भव्य घाटामुळे या देवस्थानाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पवित्र वातावरणाने प्रभावित होऊन धार्मिक अल्बमच्या चित्रीकरणासाठी या स्थळाची निवड करण्यात आली. त्यामुळे धनेश्वर देवस्थानाची ओळख केवळ श्रद्धेचे केंद्र म्हणून नव्हे, तर धार्मिक कलाकृतींना प्रेरणा देणारे स्थळ म्हणूनही अधिक दृढ झाली आहे.
एन. पी. व्हिजन फिल्मचे मुख्य. निर्माते आबा निर्मळ व सहनिर्माते प्रमोद निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या गीतातून राधा-कृष्ण भक्तीपरंपरेतील मधुराभक्ती, समर्पण, विरह आणि ईश्वरप्राप्तीची आर्त ओढ प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीची दिव्य हाक, सांसारिक मोहापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व आणि नामस्मरणातून जीवनाला दिशा मिळते, हा संदेश गीतातून भावपूर्ण पद्धतीने व्यक्त करण्यात आला आहे. संत मीराबाई, संत तुकाराम आणि संत जनाबाई यांच्या भक्तीपरंपरेची आठवण करून देणारा आशय या गीताचे वैशिष्ट्य ठरत आहे.
या भक्तिमय गीतात ॲड. प्राजक्ता घोलप यांनी प्रमुख भूमिका साकारली असून प्रिया निर्मळ, हनुमंत शिंदे, प्रणाली घोलप आणि प्रमोद निर्मळ यांनीही प्रभावी अभिनयाने गीताला चार चाँद लावले आहेत. धनेश्वर देवस्थानाच्या प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणामुळे चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय ठरल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.
चित्रीकरणानंतर धनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कलाकार, तांत्रिक कर्मचारी आणि संपूर्ण निर्मिती पथकाचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, धानोरे ग्रामस्थ तसेच राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष शहाजी दिघे व संपूर्ण ट्रस्टच्या वतीने एन पी व्हिजन चैनल च्या सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व एन पी व्हिजन चैनल नेहमी चांगल्या विषयाला धरून काम करण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात व टीमचे भरभरून कौतुक त्यांनी केले त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक वारशाचे जतन करताना आधुनिक माध्यमातून भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम धनेश्वर देवस्थानासाठी नवी ओळख निर्माण करणारा ठरला असून, भविष्यातही अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना देवस्थानातून चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी - रूपाली भालेराव
सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर
0 Comments