शिर्डी (प्रतिनिधी)-गुरु पौर्णिमा केवळ पूजा करण्याचा दिवस नसून आत्मचिंतन साधना आणि गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा व चांगला संकल्प करण्याचा दिवस असल्याचे मत श्री पंच दशनाम जुना आखाडा, श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
   श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्ट च्या वतीने श्री नर्मदेश्वर सेवाधाम पिंपरी निर्मळ येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावात व श्रद्धेने नुकताच संपन्न झाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी साधकांची, भाविकांची मोठी उपस्थिती होती.
येथे भजन, प्रवचन, दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित साधक व भाविकांना आशीर्वाद रुपी मार्गदर्शन करताना महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले की, भारतीय सनातन संस्कृतीमध्ये गुरूला सर्वोच्च स्थान मानले असून गुरु केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून एक दिव्य शक्ती आहे, की जे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश प्रदान करत असतात. म्हणूनच आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!! असे म्हणत असतो. गुरुभक्ती म्हणजे केवळ हार ,फुल, वस्त्र, दक्षिणा किंवा सत्कार, सन्मान करणे नसून खऱ्या अर्थाने गुरुभक्ती म्हणजे गुरुच्या आदेश, सूचना, आदर्श, वचनानुसार आपल्या जीवनामध्ये पालन करून आपले जीवन चरित्र पवित्र बनवणे हीच खरी गुरुभक्ती आहे. गुरु केवळ मंत्र, उपदेश देत नाही तर जीवनातील खरे ज्ञान देतात. गुरु हे सत्य, सेवा, संयम, प्रेम, आणि धर्माचे आचरण करण्याचा मार्ग दाखवतात. या मार्गावर चालणे हीच खरी सच्ची गुरुभक्ती आहे. आपल्या गुरु वरील श्रद्धा आणि विश्वास हीच खरी गुरुभक्तीची शक्ती आहे. दररोज आपल्या गुरुने दिलेला मंत्र श्रद्धापूर्वक जप करून गुरूच्या उपदेशाचे पालन करत सत्संग, सेवा आणि आत्मचिंतन करणे हीच खरी गुरुची सच्ची पूजा आहे. जो निष्काम भाव ठेवून सेवा करतो, जीवनात सत्याचे पालन करतो, अंतकरणात कायम पवित्रता व श्रद्धाभाव ठेवून निष्कपट प्रेम व पूर्ण समर्पणाने भक्ती सेवा करतो, अशांती, व्यसन ,स्वार्थ, हिंसा अनैतिकपणा, व असत्य यापासून बाजूला राहतो. गुरुच्या उपदेशाच्या मार्गावर चालतो तो व त्याचा परिवार नेहमी सुखी समाधानी होतो. म्हणून गुरुच्या आदर्श व उपदेशांचे आपल्या जीवनात मोठ्या भक्तीने व श्रद्धेने पालन करून सत्य व करुणेच्या मार्गावर निरंतर गुरुच्या आदेशानुसार चालत राहणे हीच खरी गुरु सेवा आहे व गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाने तसा संकल्प करावा. असे सांगत सर्व साधकांची व भाविकांची जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि अध्यात्मिक उन्नती व्हावी. असे शुभाशीर्वाद यावेळी मंहत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांनी दिले. यावेळी सर्व उपस्थित साधक व भाविकांनीही तसा संकल्प करत मनोभावे प्रार्थना व दर्शन घेत आपल्या गुरूंना मनोभावे नमन केले. या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला साधक,व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.