दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९-- सोयगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन ॲपद्वारे खत बुकिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकरी तसेच कृषी केंद्र चालकांना तांत्रिक त्रुटींमुळे खत उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर दंडाधिकारी विधाते , सिल्लोड सोयगाव उपविभागीय अधिकारी निलेश आपार, जिल्हा कृषी सहायक प्रमोद पाटील व जिल्हा कृषी अधीक्षक दिपक गवळी यांना निवेदन सादर केले. निवेदनात ऑनलाईन खत बुकिंग प्रक्रियेमधील त्रुटी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना सहज व सुरळीतपणे खत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणीही करण्यात आली. याबाबत माहिती देताना जिल्हा कृषी सहायक प्रमोद पाटील यांनी मलकापूर येथूनही खताच्या रॅकचे नियोजन करण्यात येत असून, लवकरच खत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे उपस्थित होत्या.शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जि.प. सदस्या पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या या मागणीमुळे खत पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
0 Comments