शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील गणेशनगर जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आणि एसटी महामंडळाचे आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव यांनी आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत आपल्याला संस्काराचे धडे मिळाले ,त्या गणेशनगर शाळेला सुमारे 11 हजार रुपयांची चार्जिंग साऊंड सिस्टिम भेट दिली. यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे आणि राहाता बस स्थानक प्रमुख किरण राऊत यांच्या हस्ते मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्त केली. या अगोदरही राजेंद्र जाधव यांनी आपल्या वर्ग मित्रांच्या मदतीने परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेतलेला आहे.
परिसरात एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याप्रसंगी अनिल काका गाढवे म्हणाले की, गणेशनगर शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, शिक्षक वर्ग चांगला मिळाला आहे, विद्यार्थ्यांना शिस्त आहे, तालुक्यात आणि जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढलेला आहे. गणेश कारखान्याच्या वतीने शक्य तेवढी मदत शाळेला केली जात आहे. सत्कार प्रसंगी राजेंद्र जाधव म्हणाले की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या माध्यमातून माझी फार आर्थिक परिस्थिती भक्कम नसताना देखील मी शाळेने केलेल्या संस्कारातून उतराई होण्यासाठी साऊंड सिस्टिम भेट दिली. यापुढेही मला शक्य तेवढी मदत शाळेला करत राहील. या शाळेने माझ्यावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केल्यामुळे मी घडलो आहे. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संहत घोलप यांनी शाळेची पार्श्वभूमी सांगितली. पदवीधर शिक्षक कैलास चिंधे यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेचा गरजा याविषयी सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार सुनिता गागरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील गायकवाड, भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे, व्हेरोनिका गायकवाड, सोनल भावसार, मनीषा निर्मळ यांनी विशेष प्रयत्न केले .शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव यांनी देखील राजेंद्र जाधव यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
0 Comments