दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४-- सोयगाव तालुक्यात सध्या अवैध गौण
खनिज उत्खननाचे प्रकार सातत्याने समोर येत आहे असे असतानाच दि.१४ रविवार सुट्टीचा दिवस असतांना देखील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे अंतर्गत असलेल्या माळेगाव पिंपरी शिवारातील धरणातून सकाळ पासून जेसीबीच्या (नंबर नाही)सहाय्याने हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ ए पी ७४६०, हायवा क्रमांक एम एच २० जी वाय ९१११, एम एच २० जी झेड ४४०५, या द्वारे वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता.
कनिष्ठ अभियंता पीयूष शिंपी यांची धरणात एन्ट्री होताच एक ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह धूम ठोकली. दरम्यान अनेक दिवसांपासून धरणातून मुरुम उत्खनन करून वाहतूक सुरू होती याप्रकरणी कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि.इंदौर या कंपनीला जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उप विभाग सिल्लोड उप अभियंता रुचिका घोगरे यांनी दि.०८ जून ला पत्र दिले असून कार्यालयाचे नाहरकत प्रमाण पत्र नसतांना देखील धरणातून मुरुम उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी महसूल कडून परवानगी घेतली असल्यास तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.सात दिवसांचा कालावधी लोटला असून अहवाल गुलदस्त्यात असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान रविवारी धरणात मुरुम उत्खनन सुरू असल्या बाबत जरंडी ग्राम महसूल अधिकारी चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता.त्यानंतर जरंडी मंडळ अधिकारी पंडित यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले बघतो.शासनाचा महसूल वसूल व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतांना महसुलच्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जात नसल्याने नायब तहसीलदार,तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना व्हॉट्सऍप द्वारे माहिती देण्यात आली त्यांनी ही प्रतिसाद दिला नाही.अखेर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देखील व्हॉट्सऍप द्वारे माहिती देण्यात आली परंतु महसूलचा एकही कर्मचारी धरणाकडे फिरकला नाही.धरणातील मुरुम उत्खनना बाबत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता कपिल बिडकर यांना व्हॉट्सऍप द्वारे माहिती देण्यात आली असता त्यांनी याची तात्काळ दखल घेतली व सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कनिष्ठ अभियंता पीयूष शिंपी यांनी धरणात मुरुम उत्खनन करणाऱ्या जेसीबी,दोन हायवा व एक ट्रॅक्टर यांचा पंचनामा करीत असताना मुरुम भरण्यासाठी धरणात येत असलेल्या ट्रॅक्टर चालकास दिसताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह धरणातून धूम ठोकली. त्यामुळे या उत्खननाला परवानगी कुणाची, याचा शोध महसूल विभागाने घेण्याची गरज आहे.तालुक्यात सोयगाव-बनोटी रस्त्यांचे दुहेरीकरणाचे काम सुरु असून, काही ठिकाणी कामे पूर्णत्त्वास गेल्याची माहिती आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. माळेगाव पिंपरी शिवारातील धरणातून मुरुमाचे उत्खनन अनेक दिवसांपासून सुरू असून चक्क या धरणाची संरक्षण भिंत सुद्धा पोखरून टाकली आहे. यामुळे धरणाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान मुरुम उत्खनन करण्यास महसूल प्रशासनाने परवानगी दिली काय? सदर धरण पाट बंधारे विभागाला कुणाला उत्खननासाठी दिलंय, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे. वास्तविक पाहता तात्पुरत्या परवान्यावर केवळ सहा मीटरपर्यंत उत्खनन करता येते. मात्र, त्यापेक्षा अधिक खोलपर्यंत हे उत्खनन केले असताना मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments