जागतिक नेत्रदान दिनानिमित्त साईनाथ नेत्रपेढीच्या वतीने जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा करण्यात आला सन्मान!




शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्रपेढीच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. अजित पाटील, डॉ. सौदामिनी निघुते, डॉ. अनघा विखे, अधिसेविका नजमा सय्यद ,राहुल जगताप, यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, नेत्रदात्यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. आय बँक मॅनेजर डॉ. अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्त्व व जनजागृतीची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गेल्या वर्षभरात नेत्रदान केलेल्या २६ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा श्रीसाईंची शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्या कुटुंबीयांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments