दिलीप शिंदे
सोयगाव दि.२५-- मोहळाई - सोयगाव रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून ठेकेदाराच्या नियोजनाच्या अभावामुळे पहिल्याच पावसात सोयगाव- बनोटी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या कामा दरम्यान पर्यायी रस्त्याने मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने रस्ता दिसेनासा झाला असून चिखलमय झाला आहे. यामुळे परिवहन महामंडळाची बनोटी वाहतूक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून बनोटी कडे जाणाऱ्या प्रवाशांना पाचोरा मार्गे जावे लागत आहे. रस्ता दुरुस्तीकडे ठेकेदार जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना या रस्त्याने ये- जा करतांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नागद- बनोटी- सोयगाव- फर्दापूर या ७० किमी अंतर असलेल्या राज्यमार्ग क्रमांक २४ चे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून नागद कडून कामास सुरुवात करण्यात आली आहे. एका बाजूने काम करणे व दुसरी बाजूने रहदारी साठी सुरळीत रस्ता करून देणे हे ठेकेदाराचे काम आहे.मात्र सोयगाव-बनोटी दरम्यान पूर्ण रस्ता पोखरून त्यावर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला.पाण्याचा उपयोग न करता त्याची दबाई करण्यात आली. ठेकेदाराचे नियोजनाच्या अभावामुळे पहिल्याच पावसात उमरविहिरे,घोसला व इतर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्ता दिसेनासा झाला आहे. तर रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्याने दुचाकीस्वारांना प्रवास करतांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे.दुचाकी स्लिप होऊन अपघात झाले आहे.किरकोळ दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही अपरिहार्य घटना घडली नाही.मात्र अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.
याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ठेकेदारास समज देत वाहतुकीसाठी चांगल्याप्रकारे रस्ता करावा व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजण्यात येऊन साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास ठेकेदारासह संबंधित रस्त्याची देखभाल करणाऱ्या शासकीय अभियंत्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल असे नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
0 Comments