डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायात नैतिकता आणि समाजाप्रतीचे ऋण जपावे- ॲड. प्रतिभा भराड.


विजय बोडखे 

राजुरी(वार्ताहर) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी केवळ करिअरचा विचार न करता समाजाप्रतीचे आपले ऋण फेडण्याचे काम केले पाहिजे. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा. वैद्यकीय क्षेत्रात फॉरेन्सिक मेडिसिनचे (न्यायवैद्यकशास्त्राचे) कार्य अत्यंत महत्त्वाचे असून, डॉक्टरांनी आपल्या दैनंदिन कामात नैतिकता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. प्रतिभा भराड यांनी केले.
डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाच्या वतीने मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम २०१४ या कायद्यावर आधारित 'मुट कोर्ट' या शैक्षणिक उपक्रमाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेला कोर्टाचा देखावा, केस सादरीकरणातील अभिनय, कायदे आणि मुद्दे यांचा अप्रतिम संगम या मुट कोर्टच्या संकल्पनेतून पाहायला मिळाल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी शिर्डी येथील पोलिस उपअधिक्षक अमोल भारती, विश्वस्त व सह संचालक ध्रूव विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विष्णू मगरे, अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश जगदाळे, फॉरेन्सिक मेडीसीन विभाग प्रमुख डॉ.मोहन पवार, डॉ. जे. एम. फारूकी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात चांगल्या संस्कारांची जपणूक केली पाहिजे. डॉक्टरकीच्या पेशाचा आदर ठेवून समाजाची निस्वार्थ सेवा करणे अपेक्षित आहे. वैद्यकीय कामकाजातील सर्व कायदेशीर नियमांची अचूक माहिती करून घेतल्यास भविष्यातील त्रुटी टाळता येतील. तसेच, वेळेचे भान ठेवून रोजची कामे त्याच दिवशी पूर्ण करण्याची सवय लावा. फॉरेन्सिक मेडिसिनच्या कामात अगदी छोटी गोष्टसुद्धा नजरेतून सुटता कामा नये, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला फॉरेन्सिक मेडिसिनचे विभाग प्रमुख डॉ. मोहन पवार यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. या मुट कोर्ट नाटिकेमध्ये २०२३ बॅचच्या तृतीय वर्षातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेऊन कायदेशीर प्रक्रियेचे हुबेहूब सादरीकरण केले.

Post a Comment

0 Comments