कर्तृत्वाचा जल्लोष; ‘सौंदर्य कलावती पुरस्कार २०२६’ने राज्यभरातील मान्यवरांचा केला गौरव!



अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीत रंगला दिमाखदार सोहळा; कला, साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवेतील कर्तृत्वाला सलाम

प्रवरानगर प्रतिनिधी : कला, साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरावर सन्मानित करणारा ‘सौंदर्य कलावती पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साह, जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच खुलली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रिदम परिवाराच्या वतीने अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही पर्वणी रंगली. गणेश वंदना, लावणी, फ्यूजन सॉंग आणि झुंबा ग्रुपच्या महिलांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महिलांसाठी आयोजित मनोरंजनात्मक खेळांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट निलेश यादव यांनी आधुनिक हेअर स्टाईल्सचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विनोद वाघमारे, राधाकिसन वाघमारे, सुनील पाटील आणि स्नेहमाला फाऊंडेशन यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी अशा पुरस्कारांमुळे समाजातील सकारात्मक कार्याला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास नगरसेविका नवनीतकौर लकी सेठी, रणजितदादा पाटील, शंकर सोनावणे, शहाजी दिघे, भाग्यश्री, प्रणिती चव्हाण, वैशाली पोटे, राजू बाणेदार, पार्वती वाघमारे, वैशाली कोते, डॉ. शीतल घोगरे, पुष्पा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देत कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा पुरस्कार सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

चौकट 

"गौरव कर्तृत्वाचा, सन्मान समाजभानाचा; ‘सौंदर्य कलावती पुरस्कार २०२६’ने राज्यातील प्रतिभेला दिला मानाचा मुजरा!"

Post a Comment

0 Comments