सिंहस्थ २०२७-२८ साठी नवी दिशा; पीएचडीसीसीआयच्या ‘रूहमॅन्टिक’ परिषदेत आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर झाले मंथन!



300 हून अधिक प्रतिनिधींनी नोंदवला सहभाग!

 शिर्डी (प्रतिनिधी)- सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आध्यात्मिक पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘रूहमॅन्टिक :पीएचडीसीसीआयची तिसरी ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॉन्क्लेव्ह’ या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या परिषदेत देशभरातील ३०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. 
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव श्री भुवनेश कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठे आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन सर्किटद्वारे जोडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री नीलेश आर. गटणे यांनी शिर्डीतील पर्यटन अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी एमटीडीसी आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यात सहकार्य वाढविण्यात येणार असल्याची माहिती दिली. 
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी शिर्डीची जागतिक आध्यात्मिक केंद्र म्हणून होत असलेली प्रगती अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, ६१ हून अधिक देशांतील साईभक्त शिर्डीला भेट देतात. संस्थानने दर्शन रांग संकुल, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सुविधा, निवास व्यवस्था आणि दररोज हजारो भाविकांना भोजन देणारे प्रसादालय अशा अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालक श्री मंगेश जोशी यांनी सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा नसून दीर्घकालीन पर्यटन विकासाची संधी असल्याचे सांगितले. शिर्डी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर यांना एकात्मिक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक पर्यटन सर्किट म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील यांनी आध्यात्मिक पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी स्वच्छता, नागरी सुविधा आणि लोकसहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. 
परिषदेदरम्यान ‘From Darshan to Destination: The Transformation of Spiritual Tourism in India’ या विषयावरील पीएचडीसीसीआय-केपीएमजी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालात आध्यात्मिक पर्यटनातील बदलते प्रवाह, तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत विकास आणि पर्यटन नियोजनाच्या संधींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. 
दिवसभर विविध सत्रांमध्ये सिंहस्थ २०२७, आध्यात्मिक पर्यटन कॉरिडॉर, २४ तास उपलब्ध आध्यात्मिक अनुभव, मंदिर वास्तुकला, वारसा संवर्धन, वेलनेस पर्यटन आणि अध्यात्माशी निगडित नव्या संधी यांवर चर्चा झाली. 
परिषदेचा समारोप श्री साईबाबा मंदिर दर्शन, भक्तीमय भजन संध्या आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर अभ्यास दौर्‍याने झाला. सिंहस्थ २०२७-२८ च्या यशस्वी आयोजनासह महाराष्ट्राला जागतिक आध्यात्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे स्थान मिळवून देण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments