शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डी येथील श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणगी अर्पण करत असतात. श्री साईंच्या श्रद्धेपोटी गुरुवार 4 जून 2026 रोजी
श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला हैदराबाद येथील साईभक्त साईदीप अन्नदाता यांनी सुमारे १२ लाख ८० हजार रुपये किमतीची सेंट्रल व्हॅक्यूम पंप व एअर ड्रायर ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरूपात प्रदान केली.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग तसेच विविध वॉर्डमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली ही उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सेंट्रल व्हॅक्यूम पंपद्वारे सक्शनसाठी आवश्यक व्हॅक्यूम निर्माण केला जातो, तर एअर ड्रायरद्वारे कॉम्प्रेस्ड एअरमधील ओलावा काढून स्वच्छ व कोरडी हवा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता वाढून रुग्णसेवा अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईदीप अन्नदाता यांचे रुग्णसेवेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, आधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, बायोमेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, कार्तिक पांगारकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पंजाब राज्यातील भटींडा येथील साईभक्त श्री अजय कुमार यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.हा मुकुट श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर मुकुटाची किंमत सुमारे २९ लाख १९ हजार ८०० रुपये आहे.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्त श्री अजय कुमार यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.तसेच आजच गुरुवारी एका साईभक्ताने सुमारे ०५ लाख ४० हजार १६३ रुपये किंमतीचा, आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. या दानशूर साई भक्तांचा साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
0 Comments