डॉ. विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोघांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; आई-बहिणीच्या मूत्रपिंड दानातून दोन रुग्णांना नवजीवन



राजुरी (वार्ताहर) :  विजय बोडखे 
लोणी (वार्ताहर) : लोणी ता. राहाता येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने ग्रामीण भागातील दोन रुग्णांना नवसंजीवनी देत पुन्हा एकदा आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू असलेल्या अवयव प्रत्यारोपण केंद्रात एका आईने आपल्या ३६ वर्षीय मुलाला, तर एका बहिणीने आपल्या ४८ वर्षीय भावाला मूत्रपिंड दान केले. दोन्ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या असून रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ३६ वर्षीय तरुण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होता. उपचारासाठी तो लोणी येथील प्रवरा मेडिकल रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्याच्या आईने स्वतःचे मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ वर्षीय व्यक्तीस देखील त्यांच्या बहिणीने मूत्रपिंड दान केले. या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय प्रशासनातील अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रुग्णालय प्रशासन संचालक डॉ. योगेंद्र सिंह, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. एन. एस. पवार, डॉ. जोरवेकर, डॉ. तुषार भवर, डॉ. संजय चौधरी, डॉ. अमोल भालेराव, डॉ. मयूर गंगवाल, डॉ. ऋषिकेश वाघोलीकर, डॉ. काजल दरंडले, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. सूरज बांगर, डॉ. भाग्यश्री पुराणिक तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, असे स्वप्न पाहिले होते. आज डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या स्वप्नांची यशस्वी पूर्तता होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर मराठवाड्यासह राज्यातील जवळपास सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना येथे जीवनदान मिळत आहे.
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. विपिन विभुते, डॉ. राहुल तांबे, डॉ. मनीषप्रसाद पाठक यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. तसेच अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला. रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अनुभवी डॉक्टरांची टीम, रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासन यांच्या संयुक्त परिश्रमामुळे हे यश संपादन करता आले.
लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९९७५३०९७०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments