दिलीप शिंदे
सोयगाव दि. ३०-- शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील वाढत्या अनिष्ट चाली-रीतींवर नियंत्रण आणण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजातील लग्नकार्य, साखरपुडा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाढत चाललेल्या अनावश्यक खर्चिक व सामाजिकदृष्ट्या घातक प्रथांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत समाजामध्ये वेळेवर लग्न लावणे, वैदिक पद्धतीने एकाच वेळेत विवाह पार पाडणे, मेहंदी व प्री-वेडिंग शूट यांसारख्या नव्याने सुरू झालेल्या खर्चिक प्रथा बंद करणे, लग्नातील बॅनरबाजी थांबवणे, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करण्यास मर्यादा ठेवणे, साखरपुडा सकाळी १२ वाजेच्या आत घेणे तसेच वाजंत्रीस वेळेचे बंधन ठेवणे अशा विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. समाजात साधेपणा, संस्कार आणि आर्थिक बचत यांचे महत्व टिकवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील बारी समाज पंच मंडळांची दि.०७ जून रोजी सकाळी अकरा वाजता शिरसोली (जळगाव) प्र. बो. येथील मंगल कार्यालयात एकत्रित बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, ऐनपूर, भुसावळ, सोयगाव, आमखेडा, शेंदुर्णी, पहूर, पहूर पेठ, कुऱ्हा आदी ठिकाणी बैठका घेण्यात आल्या असून बऱ्हाणपूर, बांभाडा, शहापूर व अंतुर्ली येथील बारी समाजाचे महत्त्वाच्या पदाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली.
बैठकीस रतन काटोले, चंद्रकांत अस्वार, लक्ष्मण नाईक, दिगंबर बारी, गिरीश वराडे, राजेश आंबटकर यांच्यासह सोयगाव व आमखेडा येथील समाज बांधव उपस्थित होते. आमखेडा तालुका बारी समाजाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ काशीराम फुसे, उपाध्यक्ष गजानन लक्ष्मण ढगे, सहसचिव मनोज रघुनाथ आगे, सचिव रामदास लाडूबा फुसे तसेच सोयगाव तालुका बारी समाजाचे अध्यक्ष हरिदास रामदास काटोले, उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम फुसे, सचिव गणेश पांडुरंग आगे, उपसचिव दत्तात्रय गोविंदा काटोले यांच्यासह विश्वनाथ आगे, शंकर ढगे, एकनाथ बोडखे, समाधान आगे, राजेंद्र दामधर आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजामध्ये चांगल्या परंपरा टिकवून साधेपणा, संस्कार आणि एकोपा जपण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे बारी समाजाचे तालुकाध्यक्ष हरिदास काटोले यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. तर समाजात साधेपणा, संस्कार, आर्थिक बचत आणि सामाजिक शिस्त टिकवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याने सर्वांनी सहकार्य करून एकजूट दाखवावी असे आवाहन आमखेडा बारी समाज अध्यक्ष डॉ. रघुनाथ फुसे यांनी केले आहे.
0 Comments