अठ्ठावीस प्रजातीच्या पक्षांना पंगतीचं आवतन देत वृक्ष जन्माचे धरतीचे पांग फेडणारा बूच "पांगारा " फुलला, मंगरूळ फाट्यावर सजला नजरेच पारणं फेडणारा पक्षांचा ज्यूस वार---




दिलीप शिंदे 
 सोयगाव दि.०८-- पळस आणी पांगाऱ्याची भावकी. आधी लाल भडक रंग लेवून पळस फुलतो, मावळतो अनं तोच काटे सावर लाल छटा उधळत गुडी पाडव्याला निरोप घेते अनं तोच ही दोन झाडे आपल्या छटा पांगऱ्याला जणू बहाल करतात.

मखमली लाल भगवा रंग चोपडलेली ही फुलं आहेत बूच पांगऱ्याची. नजर लागू नये असे अप्रतिम रंग सौंदर्य या फुलांचे,नजरेत सामावतच नव्हते हे अग्नी रंग, निसर्ग सौंदर्य दिसायला खरं तर नजर लागते.
 तशी या फुलांना मुळीच गंध नव्हे पण ज्याची मानवा सहित मेहेर नजर आहे त्या विधात्याने ही उणीव अग्नी रंग ,कोमल रूप व नजाकत बहाल करून भरून काढली आहे. या भगव्या लाल फुलांना कसलाही सुगंध नाही, ही खंत निसर्गाने रंगात व मकरंदात भर भरून काढली आहे. शिंजीर, जांभळा शिंजीर, शृंगराज, राखी वटवट्या, रानभाई,रान चिमणी, तांबट, कवड्या सुतार, पळस मैना, कुंटुक, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, हळद्या, जंगली मैना, भांग पाडी मैना, किर पोपट ई.सुमारे अठ्ठावीस प्रजातीच्या पाखरांना हा "बूच पांगारा" मकरंद पुरवतो. किर पोपट व रान चिमणी ही तर या फुलांच्या पाकळ्या आवडीने खाते. गाय कावळा , कुंटुक,काळटोप कस्तूर,कवड्या सुतार हे पक्षी याच्या काटेरी फांदया घरटी बांधनीस वापरतात. पूर्वी बारी समाज बांधव या पांगारा ची दुसरी प्रजाती असलेल्या पांगारा ची पांन मळ्यात लावगड करत, पानवेल या वर चढवली जात असे कारण हा झूडुप वर्गीय झाड खुप थंड, शीतल सावली देते.
       ---- नजरेचं पारणं फेडणारा हा फुलोत्सव बघून कवीच्या नजरेत काय अक्षरे उभी ठाकली असतील बरं सांज वेळी लाल जर्द लीपस्टिक लावलेल्या, हवेच्या झूलुकाने नर्तन करणाऱ्या या नटीच्या भोवती पाखरांच्या मंजुळ किलबिलाटाचे संगीत गुंजन ऐकू येते.हा वृक्ष आपल्या जन्माचे धरतीचे अनं तिच्या लेकरांचे "पांग " फेडण्यास भर चैतीच्या उन्हात उभा राहतो.पाखरं, फुलपाखरं, मधमाशा यांना मध, मकरंद, मस्ती पुरवणारा हा वृक्ष यौवन, चैत्र, नी अप्रतिम सौंदर्य यांचा मिलाप आहे.वसंता च्या अन चैताच्या अखेरला सकाळी सकाळी तर असे भासते कि उगवतीचा सूर्य या झाडाच्या काटेरी फांदया त च अडकला जणू.
      ------ पळस पांगारे भडक लाल,अंगाला माखुनी येती गुलाल, रानात पेटली फुलांची आग, अवघ्या वना ये नवखी जाग ll या शब्दात कवियत्री शांता शेळके यांनी हा फुलोत्सव रेखाटला आहे. संधी मिळाली तर हे निसर्ग सौंदर्य नजर अंदाज करू नका.हा जैव ठेवा नजरे आड जाऊ नये म्हणून जतन ही करू आपण. वेळ मिळाला तर मंगरूळ फाट्यावर एक "नजर" मारावी असे डॉ. संतोष पाटील अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments