माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे ना. राधाकृष्ण विखे यांना निमंत्रण



लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जून २०२६ मध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील आणि प्राचार्य विनायक मेथवडे यांनी निमंत्रण दिले आहे.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयास ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जून २०२६ मध्ये होणाऱ्या भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरदचंद्रजी पवारसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी वसतिगृह इमारत, कनिष्ठ महाविद्यालय इमारत आणि नियोजित बहुउद्देशीय सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या नियोजित बहुउद्देशीय सभागृहासाठी पवार साहेब यांनी बारामती स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बारामती यांचेकडून ५० लाख रुपयांची देणगी मिळून दिली आहे. आजी-माजी शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांकडून भरीव देणगी विद्यालयास प्राप्त होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध मान्यवरांसह राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्नेह मेळाव्याचे निमंत्रण पत्र रावसाहेब म्हस्के पाटील व प्राचार्य विनायक मेथवडे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात जनता दरबारप्रसंगी स्वतंत्र बैठकीत दिले. यावेळी नामदार विखे साहेबांनी हे निमंत्रण स्वीकारून मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे मान्य केले. याप्रसंगी डॉ. शरद दुधाट, संजय डुबे, बाबासाहेब अंत्रे, साहिल खर्डे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments