दिलीप शिंदे
सोयगाव दि.०९ सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा, तिडका, नांदगाव व घोसला येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे न करता संबंधित तलाठी यांनी कृषी विभागाच्या सहभागाशिवाय अपूर्ण व बोगस पंचनामे केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.या तक्रारीची दखल घेत आमखेडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांनी तहसील कार्यालय, सोयगाव येथे भेट देऊन परिस्थितीची आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता, शेतकऱ्यांनी केलेले आरोप प्राथमिक पाहणीत सत्य असल्याचे निदर्शनास आले.याप्रसंगी पुष्पाताई काळे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सूचना देत येत्या १६ एप्रिल गुरुवारी संबंधित तलाठी, कर्मचारी, तहसीलदार आणि बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून प्रकरण तत्काळ मार्गी लावण्याची ताकीदही त्यांनी दिली.शेतकऱ्यांचे नुकसान योग्य पद्धतीने नोंदवून शासनाकडून मिळणारी मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने पारदर्शक व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. या प्रकरणाकडे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून १६ तारखेच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
0 Comments