पाण्याच्या शोधार्थ जंगलातून आलेला वन्यप्राणी रोही नाल्यात मृतावस्थेत, वन्यजीव संवर्धन दिनीच घटना, वन्यप्राणी प्रेमींमधून संताप --




दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३-- घटोत्कच लेणी रस्त्यावरील रावेरी शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या नर जातीचा रोही नाल्यात मृतावस्थेत आढळून आल्याची घटना दि.०३ मंगळवारी वन्यजीव संवर्धन दिनीच दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
 याप्रकरणी वनविभाग सोयगाव यांच्याकडून काय कारवाई करण्यात आली याबाबत रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.सोयगाव तालुक्यात रोही या वन्यप्राण्यांच्या मृत्यूची संख्या वाढतच असल्याने वन्य प्राणी प्रेमींमधून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
             याबाबत सविस्तर माहिती अशी, आमखेडा - घटोत्कच लेणी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रावेरी शिवारात असलेल्या नाल्याजवळ दोन विहिरी असून एक विहिर बांधलेली असून एक छोटी साधी विहिरी आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगलात पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जंगलात असलेल्या धरणातून पाईपाद्वारे पाण्याचा उपसा केला जात असल्याने मानवी संचार दिवस रात्र वाढला आहे. तर जंगलात असलेले नदी,नाले यातून रात्री,बेरात्री अवैधरित्या वाळू व वीटभट्ट्याना लागणारी ढिसूळ काळया मातीची सर्रास वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल व वनविभागाने सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले आहे. दिवसा,रात्री,बेरात्री मानवांसह ट्रॅक्टरांचा संचार जंगलात वाढल्याने वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दि.०३ मार्च वन्यजीव संवर्धन दिनीच पाण्याच्या शोधार्थ जंगलातून आलेल्या एका वन्य प्राण्याला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आल्याने वन्यप्राणी प्रेमींमधून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी घटनेबाबत वनकर्मचारी यांना सूचना दिल्या असून सरकारी वाहन घेऊन वनकर्मचारी दुपारी सव्वा वाजता घटनास्थळी रवाना झाल्याचे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. रोही या वन्य प्राण्याचा मृत्यू कशामुळे झाला त्याचे शव विच्छेदन करण्यात आले किंवा नाही, याबाबत वनविभागाकडून रात्री उशिरा पर्यंत स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. सोयगाव तालुक्यात रोही या वन्यप्राण्यांच्या मृत्यू मध्ये वाढ होत असल्याने वनविभाग यावर काय उपाययोजना करणार हे मात्र निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments