शिर्डी ( प्रतिनिधी)-जीवनात सुख हे येते व जाते, मात्र आत्मिक मिळणारा आनंद हा कायम असतो. म्हणूनच तो मिळवण्यासाठी ध्यान साधना आत्मिकचिंतन व भगवंताचे नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे. त्यातून एक शांत स्थिर आणि गाढभावना निर्माण होते व या भावनेलाच खरा आनंद म्हटले जाते. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत राजराजेश्वरी संन्यासी आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टी येतात आणि जातात. त्यामधून कधी सुख मिळते, तर कधी दुःखही येते. पण सुख ही अशी गोष्ट आहे की ती कायम टिकत नाही. ती परिस्थितीवर, वस्तूंवर आणि काळावर अवलंबून असते.
मनुष्याला एखादी नवीन वस्तू मिळाली, धन मिळाले, मान-प्रतिष्ठा मिळाली किंवा इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी मिळाल्या तर त्याला सुख वाटते. पण काही काळानंतर त्या गोष्टीचे आकर्षण कमी होते आणि ते सुखही कमी होते. काल जी गोष्ट आपल्याला आनंद देत होती ती आज तशी वाटत नाही. त्यामुळे सुख हे नेहमी बदलत राहते आणि कधीतरी संपूनही जाते.
परंतु आनंद हा वेगळा अनुभव आहे. आनंद हा बाहेरच्या वस्तूंमुळे निर्माण होत नाही. तो मनाच्या शांतीतून, आत्म्याच्या अनुभूतीतून आणि ईश्वरभक्तीतून प्रकट होतो. जेव्हा मनुष्य ध्यान, साधना, आत्मचिंतन किंवा भगवंताच्या नामस्मरणात रमतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात एक शांत, स्थिर आणि गाढ अशी भावना निर्माण होते. त्या भावनेलाच खरा आनंद म्हणतात.
हा आनंद परिस्थिती बदलली तरी नष्ट होत नाही. बाहेरच्या गोष्टी आल्या किंवा गेल्या तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणूनच संत आणि ज्ञानी पुरुष सांगतात की सुख हे क्षणिक असते, पण आनंद हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे तो कायमचा असतो.
म्हणून मनुष्याने आयुष्यात केवळ बाह्य सुखामागे धावू नये. कारण ते थोड्या वेळासाठी येते आणि निघून जाते. खरा प्रयत्न असा असावा की अंतर्मनात शांती, समाधी आणि आत्मज्ञान निर्माण व्हावे. तेव्हा जो अनुभव येतो तो आनंद असतो, आणि तो कधीही मिटत नाही.असे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
0 Comments