तीन हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस पाटील व खासगी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि. ७ -- सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील भांडणाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून किन्ही (ता. सोयगाव ) येथील पोलीस पाटलाने पाच हजाराची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.०७ शनिवारी दुपारी सापळा रचून खाजगी व्यक्ती व पोलीस पाटलावर सोयगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील ३४ वर्षीय तक्रारदाराचे गावातील एका महिलेसॊबत भांडण झाले होते. भांडणाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, पोलीस पाटील याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तडजोडीअंती पोलीस पाटलाने तीन हजार रुपयात तडजोड केली. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने किन्ही गावात सापळा रचला, पोलीस पाटील मन्साराम बाबुराव लोखंडे याने त्याच्या मित्र संतोष भगवान शेळके (वय ४३, र दोन्ही रा. किन्ही, ता. सोयगाव) याच्या कडे पैसे देण्यास सांगितले. किन्ही येथील अशोक भोई यांच्या चहाच्या हॉटेलवर अशोक नागरगोजे, राम गोरे, रामेश्वर ताठे सापळा रचुन शेळके याला ताब्यात घेतले. संतोष शेळके याची झडती घेतली असता, त्याच्या कडे ३ हजार ६०० रुपये मिळून आले. घटनेची चाहूल लागताच पोलीस पाटील फरारी झाला आहे. पोलीस त्याच्या शोध घेत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments