(लोणी प्रतिनिधी रूपाली भालेराव ) राहाता तालुक्यातील चंद्रपूर येथे रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भागवदाचार्य सौ. सिमाताई काळे चांदवडकर यांच्या हरिभक्तीपरायण कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिर परिसर या सोहळ्यासाठी भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हजारो भाविकांनी या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेत हरिनामाचा जयघोष केला. या विशेष प्रसंगी सिमाताई काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला असून, त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर प्रतिकृती भेट म्हणून प्रदान करण्यात आली.
या मंगलमयी सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचे संचालक श्री. गोरक्षनाथ पा. तांबे, ह.भ.प. मायराज महाराज अनर्थे चंद्रपूरकर, ट्रक सोसायटी प्रवरानगरचे माजी संचालक श्री. नारायण काका कहार, श्री. पांडुरंग बाबूराव बनसोडे, श्री. अशोकराव दहिवळकर, श्री. प्रकाश खंडागळे आणि श्री. शेलार पाटील यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते ताईंचा सन्मान करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला धार्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनीही हजेरी लावली होती. यामध्ये अशोक महाराज गोत्राळ, अंबादास महाराज पवार, दत्तात्रय महाराज तांबे, मुकेश महाराज तांबे, यज्ञश्रीताई कडलग आणि शंकर महाराज शेंडे यांचा समावेश होता. तसेच डॉ. नबाजी रोकडे, नारायण रोकडे आणि मृदुगाचार्य निशांत महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कीर्तन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सिमाताईंच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाने उपस्थित भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. चंद्रपूर आणि परिसरातील हजारो भाविक या भक्ती सोहळ्याचे साक्षीदार झाले असून, या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments